आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third ODI Australia Beat India By 3 Wickets; Lost Series

तिसरा वनडे : ऑस्ट्रेलियाची भारतावर 3 विकेटने मात; मालिकाही गमावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ब्रिस्बेन आणि पर्थसारखेच पुन्हा मेलबर्नवर घडले. या वेळीसुद्धा भारताने प्रथम फलंदाजी केली. रोहितच्या जागी कोहलीने या वेळी शतक ठोकले. मात्र, गोलंदाजांच्या सुमार प्रदर्शनाने त्याचे शतक व्यर्थ ठरले. भारताला या वेळी ३०० चा टप्पाही गाठता आला नाही. भारताने ६ बाद २९५ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाने ४८.५ षटकांत ७ विकेट गमावून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल (९६) विजयाचा हीरो ठरला. यासह यजमान आॅस्ट्रेलियाने ५ वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा वनडे कॅनबेरा येथे २० जानेवारी रोजी होईल.
सलग तिसरी मालिका गमावली
भारतीय संघाने सलग तिसरी वनडे मालिका गमावली आहे. मागच्या वर्षी भारताने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावली. यानंतर भारतात द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हरलो. आता ऑस्ट्रेलियानेही भारताला धुतले.
गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी : भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार प्रदर्शन केले. धोनीने संघात बदल करताना अश्विनच्या जागी ऋषी धवन आणि मनीष पांडेच्या जागी गुरकिरत सिंगला संधी दिली. मात्र, परिणाम पराभवच राहिला. युवा गोलंदाज बरिंदर सरणने ८ षटकांत ६३ धावा दिल्या. त्याला विकेट मिळाली नाही. उमेश यादवने ९.५ षटकांत ६८ धावांत २ विकेट, ईशांत शर्माने १० षटकांत ५३ धावांत २ विकेट तर रवींद्र जडेजाने ४९ धावांत २ विकेट घेतल्या.

शॉन मार्शचे अर्धशतक
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शॉन मार्शने अॅरोन फिंचसोबत (२१) पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची तर कर्णधार स्टीव्हन स्मिथसोबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. मार्शला ईशांतने बाद केले. ऑस्ट्रेलियाची टीम एक वेळ ४ बाद १६७ धावा अशी संकटात सापडली होती. मात्र, यानंतर मॅक्सवेलने फॉकनरसोबत ८० धावांची भागीदारी करून भारताच्या हातून सामना हिसकावला. मॅक्सवेलला ४४ व्या षटकात जीवदानही मिळाले. या जीवदानाचा फायदा उचलताना त्याने ९६ धावांची आक्रमक खेळी केली. मॅक्सवेलने ३ षटकार, ८ चौकार मारले. मॅक्सवेल बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ एका धावेची गरज होती. यानंतर फॉकनरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. जेम्स फॉकनरने नाबाद २१ धावा काढल्या.
कोहलीची शतकी खेळी
भारताने विराट कोहलीच्या (११७) शतकाच्या बळावर ६ बाद २९५ धावा काढल्या. कोहलीचे हे २४ वे शतक ठरले. त्याच्याशिवाय शिखर धवन (६८) आणि अजिंक्य रहाणे (५०) यांनी अर्धशतके ठोकली. कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी धवनसोबत ११९ तर तिसऱ्या विकेटसाठी रहाणेसोबत १०९ धावांची भागीदारी केली. रोहित ६, धोनी २३, गुरकिरतने ८ धावांचे योगदान दिले.
- कोहलीने द. आफ्रिकेच्या ए.बी.डिव्हिलर्सचा सर्वात वेगाने ७ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडला. कोहलीने ही कामगिरी १६१ डावांत तर डिव्हिलर्सने १६६ डावांत केली होती.
- कोहलीने १६१ व्या डावात २४ वे शतक ठोकून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. सचिनने २१९ डावांत हा पराक्रम केला होता. कोहलीने सचिन तेंडुलकरपेक्षा ५८ डाव कमी खेळताना हे यश मिळवले.