आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय आठ पावलांवर; द. आफ्रिका बॅकफुटवर, दुसऱ्या दिवशी २० विकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आर. अश्विन (५) व रवींद्र जडेजा (४) या दोघांच्या जादुई फिरकीने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द. आफ्रिकेला ३३.१ षटकांत ७९ धावांत गुंडाळले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी घाई झाल्याप्रमाणे विकेट्स फेकल्याने टीम इंडियाचा दुसरा डाव ४६.३ षटकांत १७३ धावांत आटोपला. परिणामी, विराटच्या संघाला एकूण ३०९ धावांची आघाडी घेता आली. दिवसअखेर आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ बाद ३२ धावा काढल्या. भारताला विजयासाठी ८ विकेटची गरज अाफ्रिकेला २७८ धावांची गरज आहे. फिरकीला अनुकूल ट्रॅकवर आफ्रिका हे लक्ष्य गाठणे कठिण दिसते. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आफ्रिकेकडून एल्गर १० तर आमला ३ धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी, सकाळी अश्विन, जडेजा व मिश्रा या भारतीय फिरकी त्रिकुटाने कमालीचा धारदार मारा करून पाहुण्यांना पहिल्या डावात ७९ धावांवर रोखले. भारताला १३६ धावांची आघाडी मिळाली. अश्विनने ३२ धावांत ५, तर जडेजाने ३३ धावांत ४ फलंदाज बाद केले. अमित मिश्राने एक बळी घेतला. आफ्रिकेकडून डुमिनीने सर्वाधिक ३५ धावा काढल्या.
जेवणाच्या आधी भारताचा दुसरा डाव सुरू झाला. त्यानंतर चहापानापर्यंत भारताने ३१ षटकांत १३९ मिनिटांच्या खेळात ५ फलंदाज गमावून १०८ धावा उभारल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताकडून सलामी फलंदाज शिखर धवनने ६ चौकारांसह ३९ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराने पाच चौकार खेचून ३१ धावा केल्या. रोहित शर्माने २३, विराट कोहलीने १६ अन् अमित मिश्राने १६ धावांचे योगदान देत टीम इंडियाला दुसऱ्या डावात ४६.३ षटकांत सर्वबाद १७३ धावांपर्यंत पोहोचवले. द. आफ्रिकेचा हुकमी फिरकीपटू इम्रान ताहिरने ५, मोर्केलने ३, हार्मर व डुमिनीने प्रत्येकी एक फलंदाज टिपला.
२ तास ७ मिनिटांत आटोपला पाहुण्यांचा डाव
भारतीय फिरकीपटूंनी चेंडू चांगलेच वळवत कमाल केल्यामुळे द. आफ्रिकेची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या संघाचा पहिला डाव केवळ २ तास ७ मिनिटे अर्थात १२७ मिनिटांत आटोपला. म्हणजे टी-२० सामन्यांच्या एका डावाला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात या संघाला भारतीय फिरकीपटूंनी गुंडाळले.
आफ्रिकेची भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या
आयसीसी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान द. आफ्रिकेची ३३.१ षटकांत सर्वबाद ७९ ही भारताविरुद्ध भारत अन् विदेशातील सर्वात कमी धावसंख्या होय. याआधी भारताने द. आफ्रिकेला २००६ मध्ये त्यांच्याच देशात जोहान्सबर्ग कसोटीत २५.१ षटकांत ८४ धावांवर रोखले होते.
तिसऱ्याच दिवशी निकालाची आशा
दुसऱ्याच दिवशी सामन्याचा चौथा डाव सुरु झाला. चौथ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३१० धावांचे लक्ष्य गाठायचे असल्याने हा सामना तिसऱ्या दिवशी संपण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेत उभय संघांनाही ३०० धावांपर्यंत पोहोचता आले नाही.
तिघांच्याच २ अंकी धावा
भारताचा मारा इतका प्रखर होता की, पाहुण्या संघातील डुमिनी ३५, डुप्लेसिस १० आणि हार्मर १३, या तिघांनाच दोन अंकी धावसंख्या ओलांडता आली.
अश्विनचा बॉल ऑफ द डे
अश्विनने ज्या चेंडूवर हार्मरचा बळी घेतला, तो चेंडू बॉल ऑफ द डे ठरला. अश्विनने हा चेंडू ७० अंशांच्या कोनात वळवत सायमनला त्रिफळाचीत केले.