आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेसबॉलप्रेमी अमेरिकेला क्रिकेटचे वेड, सचिन-वॉर्नमुळे खेळ अमेरिकेत सर्वांच्या मुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टेनिस, फुटबॉल, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि अॅथलेटिक्स अशा क्रीडाप्रकारांच्या प्रेमात असलेल्या अमेरिकेने नुकतेच क्रिकेट विश्वातील तीस दिग्गज खेळाडू खेळताना प्रत्यक्षात पाहिले. नोव्हेंबरच्या प्रारंभी टी-२०ची ही मालिका झाली. या तीन सामन्यांदरम्यान अमेरिकी प्रेक्षकांच्या भावना टिपल्या आहेत माजी कसोटीपटू समीर दिघे यांनी खास ‘दिव्य मराठी’साठी...
क्रिकेटपटूंची तब्बल १० ते १२ तास हॉटेलबाहेर प्रतीक्षा करणारे चाहते, स्वाक्षरी मिळावी म्हणून दिवसभर बसलेले क्रिकेटरसिक आणि क्रिकेट सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दुथडी भरून वाहणारी बेसबॉल स्टेडियम्स, असा अनोखा नजारा होता. प्रेक्षकांमध्ये अनेक गोरे चेहरे होते. सामन्याआधीच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी ४०० ते ५०० युवा क्रिकेटपटू यायचे, ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे.

क्रिकेट हा खेळ एकेकाळी अमेरिकन लोकांचा प्रमुख ‘टाइमपास’ होता. हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु ते सत्य आहे. सन १८०० च्या सुमारास हजारो क्लबनी अमेरिकेत हा खेळ लोकप्रिय केला होता. वर्षभर सलग क्रिकेट खेळले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे अन्य खेळांनी हळूहळू क्रिकेटची जागा घेतली. मात्र आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट तेथे बाळसे धरण्याची चिन्हे दिसत आहेत. सचिन-वॉर्नच्या प्रयत्नांमुळे क्रिकेट हा खेळ अमेरिकेत सर्वांच्या मुखी पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. स्थानिक पातळीवर बरेच क्रिकेट क्लब आहेत. त्यांच्या ‘समर’मध्ये क्रिकेटही जोरात चालते. ३-४ महिन्यांचाच हा हंगाम असतो. गेल्या वर्षभरात किंवा त्यापेक्षा काही काळ आधी निवृत्त झालेले क्रिकेटपटू तेथे सराव करायचे. तेव्हा सराव पाहायलाही गर्दी व्हायची. सराव सुरू होण्याआधी स्थानिक क्लबनी सुमारे ४०० ते ५०० मुलांची प्रशिक्षणासाठी निवड केली होती. १४ ते १६ या वयोगटातील मुले होती. त्यांना सचिन तेंडुलकर फलंदाजीचे, शेन वॉर्न, मुरलीधरन फिरकी गोलंदाजीचे, जाँटी ऱ्होड्स क्षेत्ररक्षणाचे तर अॅम्ब्रोज, अाक्रम, वॉल्श हे खेळाडू वेगवान गोलंदाजीचे धडे द्यायचे.
अॅम्ब्रोज व वॉल्श यांचे वेस्ट इंडियन इंग्रजी भारत-पाकिस्तानच्या वंशांतील मुलांना समजणे कठीण होत होते. परंतु, अमेरिकन वेस्ट इंडियन व श्वेतवर्णीयांनी मात्र त्याचे ‘हेल’ अचूक पकडले. गोलंदाज अॅम्ब्रोज म्हणत होता, ‘मी तुम्हाला फास्ट बॉलर करू शकणार नाही. कारण वेगात चेंडू टाकायला तुमची शारीरिक क्षमताच असायला हवी. मात्र मी वेगवान गोलंदाजीचे तंत्र तुम्हाला शिकवू शकेन.’
- न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या आर्थिक व्यवहारांचा आरंभ बेल वाजवून केला जातो. या वेळी तो बहुमान प्रथमच क्रिकेटपटूंच्या वाट्याला आला. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि शेन वॉर्न, मॅथ्यू हेडन, आक्रम यांनी बेल वाजवली.
- बेसबॉलच्या स्टेडियमवर सामने झाले. क्रिकेट व बेसबॉलमध्ये खूपच फरक आहे. दिसायला क्रिकेट खेळाप्रमाणे वाटत असला तरीही नियम व मैदान, चेंडू, बॅट यात बराच फरक आहे.
- बेसबॉलचे स्टेडियम षटकोनी आकाराचे असते. त्यामुळे गोलाकृती मैदानावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागल्या. न्यूझीलंडमधील एक मैदान असे षटकोनी आहे. तेथे खेळताना जशी फसगत होते, तसाच काहीसा अनुभव होता. दोन्ही हातांची सीमारेषा अगदीच लहान तर समोर लांबवर सीमारेषा. त्यामुळे छोटा फटका चौकार जायचा तर मोठा फटका कधी कधी झेल व्हायचा.
- बेसबॉल स्टेडियमच्या मध्यभागी क्रिकेटच्या खेळपट्टीची जागा तयार केली होती. मात्र खेळाडूंना या खेळपट्टीवर खेळायचे होते. ती ऑस्ट्रेलियाहून आणली होती. ड्रॉप इन विकेटमुळे क्रिकेट पूर्वीच्याच जोशात खेळाडू खेळले. २० दिवसांत बेसबॉलच्या ग्राउंडचे क्रिकेट मैदानात रूपांतर करण्यात आले होते.
- सर्व खेळाडूंचे क्रिकेट हे पहिले प्रेम होते. करमणूक हे त्यानंतर आणि व्यावसायिकता त्यानंतर. त्यामुळे ईर्षेने तिन्ही सामने खेळले गेले.
- दिवाळी असूनही स्टेडियमवर भारतीय प्रेक्षकांनीही प्रचंड गर्दी केली होती. पाकिस्तानी लोकांप्रमाणेच स्थानिक गोरे व काळे क्रीडाशौकीनही प्रेक्षक म्हणून हजर होते.
- सुरुवातीला पंचाईत झाली. बेसबॉल सामन्यात जेवढे चेंडू प्रेक्षकांमध्ये मारले जातात ते परत दिले जात नाहीत. प्रेक्षक आठवण म्हणून चेंडू स्वत:कडेच ठेवून देतात. षटकारानंतर चेंडू परत येईनासे झाल्यावर आयोजकांनी युक्ती केली. सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेले ५०-५० चेंडू डाव संपल्यानंतर क्रिकेटपटूंनी बॅटनी स्टँड्समध्ये मारले. मात्र प्रेक्षकांनी सामन्यातील चेंडू परत द्यावा, असे आवाहन त्या वेळी करण्यात आले.
- १००, १५०, २५०, ५०० व कॉर्पोरेट बॉक्सेसची तिकिटे काही हजार डॉलर्सची होती. तरीही प्रत्येक सामन्याला ४० हजार प्रेक्षक यायचे. आजूबाजूच्या शहरांमधूनही प्रेक्षक आले होते हे िवशेष.
- न्यूयॉर्कला क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी स्थानिक लोक १० ते १२ तासांपासून प्रतीक्षा करीत होते. प्रत्येकांची प्रचंड संख्या पाहून बसमधील सर्व क्रिकेटपटू हबकले होते. त्यांना मग मागील दाराने त्यांच्या रूम्सपर्यंत नेण्यात आले. चेन्नईचा एक ‘आयटी’ इंजिनिअर सचिनचे पोर्ट्रेट काढण्यासाठी तब्बल १६ तास उभा होता. दुर्दैवाने त्याला सचिन भेटलाच नाही.
जीटर क्रिकेटच्या प्रेमात
डेरेक जीटर नावाला अमेरिकी बेसबॉल इतिहासात प्रचंड महत्त्व आहे. तब्बल वीस वर्षे अमेरिकींच्या गळ्यातला ताईत बनलेला हा महान खेळाडू. मात्र आता तो क्रिकेटच्या प्रेमात पडलाय. सचिन-वॉर्न यांच्या विशेष सामन्याच्या वेळी तो उपस्थित होता. सचिन तेंडुलकरला तो २-३ वेळा भेटलाही. आता जीटरच्या हाती बेसबॉल बॅटऐवजी क्रिकेटची बॅट दिसली तर आश्चर्य वाटू नये!