आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या मो. अलीने एका डावात घेतल्या 10 विकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 कराची - पाकिस्तानच्या कराची शहरातील एका स्थानिक गोलंदाजाने असाधारण प्रदर्शन करताना जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एका डावात १० गडी बाद करण्याचा भीमपराक्रम केला. कराचीचा वेगवान गोलंदाज मोहंमद अलीने झोन ३ कडून खेळताना झोन ७ च्या सर्व १० फलंदाजांना एका डावात बाद  केले. हा सामना कराचीच्या यूबीएल कॉम्प्लेक्समध्ये खेळला गेला. त्याच्या दमदार प्रदर्शनामुळे मोहंमद अलीच्या संघाने एक डाव आणि १९५ धावांनी विजय मिळवला. मोहंमद अलीची ही कामगिरी इतकी जबरदस्त होती की त्याने या १० विकेटमध्ये एकाही क्षेत्ररक्षकाची मदत घेतली नाही. त्याने ९ फलंदाज त्रिफळाचीत आणि एकाला पायचीत केले. तीनदिवसीय सामन्यांच्या प्रदर्शनाला प्रथम श्रेणीतून बाहेर करण्यात आल्याने त्याच्या या कामगिरीचा प्रथम श्रेणी विक्रमात समावेश होणार नाही.

इतिहासात सर्वप्रथम जिम लॅकरने एका डावात १० गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. लॅकरने १९५६ च्या अॅशेस मालिकेत चौथ्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत १० गडी बाद केले होते. यानंतर १९९९ मध्ये पाकविरुद्ध एका डावात १० गडी बाद करण्याचा पराक्रम भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने केला.  कुंबळेने  ९ षटके निर्धाव टाकताना ७४ धावांत १० गडी बाद केले होते. भारताने हा सामना २१२ धावांनी जिंकला होता.
 
मोहंमद अलीची कामगिरी
पाकिस्तानच्या या १९ वर्षीय युवा गोलंदाजाने ९ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १२ धावांत १० गडी बाद केले. तीनदिवसीय सामन्यात ही सर्वश्रेष्ठ गोलंदाजीपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहंमद अलीने या १० विकेट एकाही क्षेत्ररक्षकाच्या मदतीशिवाय घेतल्या. यात त्याने ९ फलंदाजांना त्रिफळाचीत केले, तर एकाला पायचीत केले.