ढाका - राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय युवा टीम चाैथ्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. तीन वेळचा चॅम्पियन भारत अाणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी विश्वचषकाची फायनल हाेणार अाहे. भारताने अातापर्यंत तीन वेळा वर्ल्डकप जिंकला अाहे. भारताने २०००, २००८ अाणि २०१२ मध्ये विश्वचषकाची फायनल जिंकली अाहे.
बांगलादेशात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा टीमने अव्वल कामगिरीच्या बळावर फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने उपांत्यपूर्व सामन्यात नामिबिया अाणि उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठता अाली. दुसरीकडे विंडीज टीमही अंतिम सामन्यात बाजी मारण्यासाठी सज्ज झाली अाहे. या टीमनेही सरस कामगिरीच्या बळावर फायनलमध्ये धडक मारली. या टीमने राेमांचक लढतीत यजमान बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवला. अाता विंडीजला तीन वेळच्या विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे.