आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडर-१९ वर्ल्डकप : भारत-वेस्ट इंडीज फायनल, वेस्ट इंडीजची बांगलादेशवर ३ विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - अंडर-१९ वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजने दमदार प्रदर्शन करून बांगलादेशला ३ विकेटने पराभूत करीत फायनलमध्ये प्रवेश केला. आता १४ फेब्रुवारी रोजी रविवारी भारत-वेस्ट इंडीज यांच्यात फायनलचा सामना रंगेल. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २२६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने ४८.४ षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात २३० धावा काढून विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा खेळाडू स्प्रिंगर सामनावीरचा मानकरी ठरला.

विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजकडून पाचव्या क्रमांकावर आलेल्या स्प्रिंगरने ६२, तर कर्णधार हेटमेरने ६० धावा काढून अर्धशतके ठोकली. सलामीवीर पोपने ३८ धावांचे योगदान दिले. कॅरटीने २२ धावा जोडल्या. स्प्रिंगरने ८८ चेंडूंचा सामना करताना आपल्या खेळीत १ षटकार आणि ५ चौकार मारले. कर्णधार हेटमेरने ५९ चेंडूंत १ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली. बांगलादेशकडून सालेह अहेमद शावोनने ३, तर मेहदी हसन मिराज आणि मो. सैफुद्दीन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, बांगलादेशने मेहदी हसन मिराजच्या अर्धशतकाच्या बळावर २२६ धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली. मिराजने ७४ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले. जोयराज शेखने ३५, तर मो. सैफुद्दीनने ३६ धावांचे योगदान दिले. इतरांनी निराशा केली. वेस्ट इंडीजकडून पॉलने ३ षटकांत २० धावा देत ३ गडी बाद केले. होल्डर, स्प्रिंगर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. स्प्रिंगरने सुरुवातीला चांगली गाेलंदाजी केली. नंतर दमदार फलंदाजी करून विजय खेचून आणला.