चेन्नई- सातव्या क्रमांकाचा फलंदाज विजय शंकरच्या (नाबाद ५१) शानदार फलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध पहिल्या अनधिकृत क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ३०१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलिया अ संघाने ४ बाद १८५ धावा काढल्या होत्या.
भारत अ संघाने बुधवारी ६ बाद २२१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कालचे नाबाद फलंदाज विजय शंकर आणि अमित मिश्रा यांनी पुढे खेळ कायम ठेवला. दोघांनी संघाचा स्कोअर २८३ धावांपर्यंत पोहोचवला. मिश्राने संघ संकटात असताना ९३ धावांच्या मोबदल्यात एका चौकाराच्या साह्याने २७ धावा काढल्या. विजय शंकर आणि अमित मिश्रा यांनी सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोडल्यानंतर भारताचा डाव आटोपण्यास वेळ लागला नाही. भारताने ३०१ धावा काढल्या. तळाचे फलंदाज अभिमन्यू मिथुन ०, उमेश यादव १ तर प्रज्ञान ओझाने २ धावंाचे योगदान दिले. विजय शंकरने नाबाद ५१ धावा काढल्या. त्याने १३५ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने ही खेळी केली. विजयच्या खेळीमुळेच भारताला तीनशेचा टप्पा गाठता आला. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा फिरकीपटू स्टिव ओ कॅफीने शानदार गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले.
हँड्सकोम्बचे अर्धशतक
यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दिवसअखेर ५८ षटकांत ४ बाद १८५ धावा काढल्या. त्यांच्याकडून हॅँड्सकोम्बने अर्धशतक झळकावताना ७५ धावांचे योगदान दिले. त्याने १३७ चेंडूंत ६ चौकारांसह ही खेळी केली. सलामीवीर आणि कर्णधार उस्मान ख्वाजाने २५, हेडने ३१ तर स्टोनिसने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले.