नवी दिल्ली - भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याची चर्चा रंगत आहे. १५ सप्टेंबर रोजी द. अाफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी
टीम इंडियाची घोषणा होणार आहे.
विराट कोहलीकडे कसोटीसह वनडेचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन टी-२० सामने, पाच वनडे आणि चार कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेचे नाव गांधी-मंडेला सिरीज असे ठेवण्यात आले आहे. आफ्रिकेचा संघ ७२ दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार धोनीला टी-२० संघाच्या नेतृत्वापुरतेच मर्यादित ठेवण्याची योजना आहे. पुढच्या वर्षी भारतात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यामुळे टी-२० संघाची जबाबदारी धोनीवरच कायम ठेवण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते.
विराटने केली कमाल : श्रीलंकेत पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दमदार पुनरागमन करून श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर २-१ ने हरवले. भारताने तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वात भारताने जूनमध्ये बांगलादेशात झालेली वनडे मालिका २-१ ने गमावली होती.
कोहलीला फायदा!
विराट कोहली जर वनडे संघाचा कर्णधार झाला तर तो फायद्यात राहू शकतो. पुढच्या वर्षभरात भारताला बहुतेक सामने भारताच्या भूमीवरच खेळायचे आहेत. अशात कोहलीकडे जिंकण्याची संधी असेल. घरच्या मैदानावर टीम इंडिया बहुतेक वेळा विरोधी संघाला मात देतेच.