कोलकाता - आयसीसी टी-२० वर्ल्डकप विजेता वेस्ट इंडीज आणि इंडीज क्रिकेट मंडळात प्रदीर्घ काळापासून खेळाडूंचे वेतन, करार, निवड प्रक्रियेवरून वाद सुरू आहे.
आपल्या संघाच्या यशानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड नरमले असून खेळाडूंशी समझोत्यास तयारी दर्शवली आहे. मिळालेली १० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वाटली जाईल, असेही मंडळाने जाहीर केले.
डब्ल्यूआयसीबीचे अध्यक्ष डेव्ह कॅमरन यांनी असे संकेत दिले आहेत. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार सॅमीने आपली नाराजी व्यक्त केली होती. क्रिकेट मंडळाने आमचे साधे अभिनंदनसुद्धा केले नाही, असे सॅमीने म्हटले होते. कॅमरन म्हणाले, "राष्ट्रीय बोर्ड मे महिन्यात वार्षिक समीक्षा बैठकीचे आयोजन करेल. यात खेळाडू, खेळाडूंची प्रतिनिधी संस्था डब्ल्यूआयपीए, निवड समिती, तांत्रिक समिती, व्यवस्थापक सामील असतील. आम्ही सर्व एकत्र बसून खेळाडूंच्या भल्यासाठी निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या खेळाडूंना कसे निवडायचे, याचाही विचार होईल. सोबतच सर्व वाद संपुष्टात आणू.'
सॅमीच्या विधानाबाबत कॅमरन यांची माफी
सॅमीने अंतर्गत विषय जगासमोर ठेवून चूक केली. त्याचे विधान अयोग्यच होते. सॅमीच्या चुकीच्या विधानाबाबत मी माफी मागतो, असे कॅमरन म्हणाले.
निकोलसने वेस्ट इंडीजची माफी मागितली
वर्ल्डकप टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या वेस्ट इंडीज संघाला "बिनडोक' म्हणणारा इंग्लिश समालोचक आणि माजी क्रिकेटपटू मार्क निकोलसने माफी मागितली. वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यानंतर कॅरेबियन कर्णधार डॅरेन सॅमीने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. यात त्याने आपल्या संघावर "बिनडोक टीम' अशी टीका झाल्याचेही सांगितले. या प्रकरणानंतर िनकोलसने सॅमी आणि वेस्ट इंडीज खेळाडूंची माफी मागितली. निकोलसने माफी मागताना म्हटले की, "मी जे काही म्हटले त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मात्र, मी जे काही लिहिले ते कोणताही खेळाडू आणि खेळासाठी योग्य नव्हतेच. मला पश्चात्ताप होत आहे. मी वेस्ट इंडीजचा कर्णधार सॅमी आणि त्याच्या संघाची माफी मागतो.'
विंडीजचे अभिनंदन
वेस्ट इंडीज खरोखर चॅम्पियन आहे. अंडर १९ असो, महिला असो की पुरुष चॅम्पियनशिप. शानदार प्रदर्शन. ब्रेथवेटने श्वास रोखणारी थरारक फलंदाजी केली होती.
- सचिन तेंडुलकर.
थरारक षटकार
मी गेली २५ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी जुळलेलो आहे. सलग चार षटकार ठोकून असा थरारक विजय मी कधीही बघितला नाही. वेस्ट इंडीजचे अभिनंदन.
- शेन वॉर्न.