आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेस्ट इंडीजचा अवघ्या १४८ धावांत खुर्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोसेयू - ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीसमोर पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले. विंडीजचा डाव अवघ्या १४८ धावांत आटोपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३ बाद ८५ धावा काढून चांगली सुरुवात केली. दिवसभरात १३ गडी बाद झाले.

दिवसाचा खेळ संपला त्या वेळी स्टीव्हन स्मिथ १७ आणि अॅडम वोग्स २० धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या ८ धावा काढून बाद झाला. त्याला टेलरने बाद केले. दुसरा सलामीवीर शॉन मार्श १९ धावा काढू शकला. त्याचा अडथळा होल्डरने दूर केला. कर्णधार मायकेल क्लार्कही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २८ चेंडूंत १ षटकार, १ चौकारासह २८ धावा काढल्या. त्याला बिशूने रामदीनकरवी झेलबाद केले. यानंतर स्मिथ आणि वोग्स यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही.

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजची पहिली विकेट ब्रेथवेटच्या रूपाने २३ धावांवर पडली. ब्रेथवेटने १० धावा काढल्या. इतर अपयशी ठरले. होपने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले.

गोलंदाज चमकले
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. स्टार्कने दोघांना पॅव्हेलियनमध्ये परतवले. नॅथन लॉयन आणि स्मिथने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मैदानावर दादागिरीच केली.

संक्षिप्त धावफलक :
वेस्ट इंडीज : सर्वबाद १४८. (होप ३६, ३/३४ जॉन्सन, ३/३३ हेझलवूड), ऑस्ट्रेलिया : ३ बाद ८५ धावा. (स्टीव्हन स्मिथ खेळत आहे १७, वोग्स खेळत आहे २०).