आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित, राहुलची अर्धशतके; भारताच्या 6 बाद 258 धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट किट्स - वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी करताना पहिल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीज अध्यक्षीय संघाविरुद्ध ६ बाद २५८ धावा काढल्या. भारताकडून सलामीवीर के. एल. राहुल (५०), शिखर धवन (५१) आणि रोहित शर्मा (नाबाद ५४) यांनी अर्धशतके ठोकली.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. भारताचे सलामीवीर राहुल आणि धवन यांनी २७ षटकांत ९३ धावांची सलामी दिली. अर्धशतकानंतर धवन निवृत्त झाला. धवनने ९० चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ५१ धावा जोडल्या. के. एल. राहुलसुद्धा अर्धशतक पूर्ण होताच निवृत्त झाला. सलामीला आलेल्या राहुलने ९९ चेंडूंत १ षटकार, ५ चौकारांसह ५० धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजाराने १०२ चेंडूंत ३४ धावा काढल्या. पुजारासुद्धा निवृत्त झाला. कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र अपयशी ठरले. कोहलीने ४० चेंडूंत २ चौकारांसह १४ धावा काढल्या. रहाणेला केवळ ५ धावा काढता आल्या. या दोघांना वॉरिकनने बाद केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रोहित शर्माने नाबाद अर्धशतक ठोकले. रोहितने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना १०९ चेंडूंत १ षटकार आणि ८ चौकार मारले. वृद्धिमान साहाने ४५ चेंडूंत २ चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले. अमित मिश्राने नाबाद १८ धावा जोडल्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी भारताने ९३ षटकांत ६ बाद २५८ धावा काढल्या होत्या. विंडीजकडून वॉरिकनने ६१ धावांत २ तर जेकब्सने १ गडी बाद केला. भारताने या सामन्यात सलामीवीर मुरली विजय वगळता इतर सर्व प्रमुख फलंदाजांना संधी दिली. फिरकीपटू आर. अश्विन, रवींद्र जडेजा यांना संधी मिळाली नाही.
रोहितचे नाबाद अर्धशतक
रोहित शर्माला कसोटीपूर्वी आपले संघात स्थान निश्चित करण्याची संधी देण्यात आली.रोहितने संधीचे सोने करताना नाबाद (५४) अर्धशतक ठोकले.
बातम्या आणखी आहेत...