आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी खेळाडूंच्या प्रदर्शनावर नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंुबळेसह कोहली. - Divya Marathi
कंुबळेसह कोहली.
बासेटेरे- वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी गुरुवारी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्षीय संघाविरुद्ध अखेरचा सामना खेळायचा आहे. या तीनदिवसीय सराव सामन्यातून दोन्ही संघांना कसोटीसाठी आपला प्लेइंग इलेव्हन निवडण्यास मदत होईल.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि नवनियुक्त कोच अनिल कुंबळे यांचे लक्ष फलंदाज आणि गोलंदाजांच्या वैयक्तिक प्रदर्शनावर असेल. खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे आगामी मालिकेत अंतिम अकरा खेळाडू निवडण्यास त्यांना मदत होईल. यामुळे खेळाडूंचे प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज बोर्ड एकादश संघात याच मैदानावर झालेला दोनदिवसीय सराव सामना ड्रॉ झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली. मात्र, फिरकीपटू अमित मिश्रा वगळता इतर गोलंदाजांनी निराश केले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतके ठोकली, तर सहाव्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माने नाबाद ५४ धावा काढून चांगले प्रदर्शन केले. कोहली या सामन्यात केवळ १४ धावा काढून स्वस्तात बाद झाला. मात्र, तो शानदार खेळाडू असून त्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरू शकत नाही. तो केव्हाही लयीत येऊ शकतो.
भारतीय गोलंदाजांची तयारी : पहिल्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार, मो. शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव या सर्वांनी निराश केले. दुखापतीमुळे प्रदीर्घ काळाने संघात पुनरागमन करणारे भुवनेश्वर आणि मो. शमी पहिल्या सराव सामन्यात संघर्ष करताना दिसले. वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार कोहलीने स्पष्टपणे मो. शमी आपली पसंत असल्याचे सांगितले होते. अशात शमीला स्वत:चा फॉर्म, फिटनेस सिद्ध करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सराव सामन्यात ईशांत शर्मा एकही विकेट घेऊ शकला नाही. मात्र, भुवनेश्वर, शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात अमित मिश्रावरही नजरा असतील. त्याने मागच्या सामन्यात ४ गडी बाद केले होते. भारताचे आणखी दोन फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनासुद्धा या सामन्यात आपली तयारी या लढतीत तपासता येईल.
समुद्रकिनारी कोहली ब्रिगेडचा फेरफटका
वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी निवांत क्षणी येथील समुद्र किनाऱ्यावर जाऊन फेरफटका मारला. कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीसुद्धा या वेळी सोबत होते. कुंबळेशिवाय संघातील इतर खेळाडूंनी समुद्रकिनारी फेरफटका मारल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आनंद लुटताना दिसत आहेत. रोहितने समुद्रकिनाऱ्यावर योगासह व्यायाम केला.
कुंबळेने लागू केली आचारसंहिता
कुंबळेने खेळाडूंसाठी कडक अाचारसंहिता तयार केली आहे. यानुसार नेट प्रॅक्टिस आणि टीम मीटिंगमध्ये उशिरा येणाऱ्याला ५० डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे. नियमानुसार दर चार दिवसांनी एक सामूहिक बैठक होणार आहे. खेळाडूंना नेट प्रॅक्टिस आणि संघ बैठकीचे महत्त्व कळण्यासाठी, शिस्त लागण्यासाठी ही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...