कोलकाता - वेस्ट इंडीजने तीन वेळेसची चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला ८ विकेटने पराभूत करून प्रथमच आयसीसी टी-२० महिला वर्ल्डकप क्रिकेट चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. वेस्ट इंडीजच्या विजयात हिली मॅथ्यूज (६६) आणि स्टेफनी टेलर (५९) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवताना कॅरेबियन खेळाडूंनी डान्स करून जोरदार
जल्लोष केला.
वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाला ५ बाद १४८ धावांच्या आव्हानात्मक स्कोअरवर रोखल्यानंतर १९.३ षटकांत २ बाद १४९ धावा काढून ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मॅथ्यूज आणि टेलर यांची भागीदारी मोडण्यात अपयशी ठरले. मॅथ्यूजने ४५ चेंडूंत ६६ धावा ठोकल्या. यात तिने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. टेलरने ५७ चेंडूंत ५९ धावा झळकावल्या. स्टेफनी टेलरने ६ चौकार खेचले.