आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायनाची अपयशी झुंज : सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले; आता लढत कांस्यपदकासाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - देशाची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिला आता कांस्यपदकासाठी चीनच्या वांग झिन हिच्याशी लढावे लागेल. सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चीनच्या यिहान वांगने सहजपणे 21-13, 21-13 ने हरवले. सामन्याचा निकाल अवघ्या 39 मिनिटांत लागला. वांगला फायनलमध्ये आपल्याच देशाच्या ली झू रुईशी लढायचे आहे. ली झू रुईने दुस-या उपांत्य सामन्यात चीनच्याच वांग झिनला 22-20, 21-8 ने नमवले.
चौथी मानांकित सायनाने अव्वल मानांकित वांगविरुद्ध दोन्ही गेममध्ये पहिला गुण मिळवून चांगली सुरुवात केली. मात्र, या आघाडीला ती फार वेळ टिकवू शकली नाही. अखेर तिला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया आणि थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावणा-या सायनाकडून भारताला लंडन ऑलिम्पिकमध्ये मोठी आशा होती. मात्र, ती चिनी फोबियातून बाहेर पडू शकली नाही. चीनच्या खेळाडूविरुद्ध हा सायनाचा सलग सहावा पराभव ठरला. आतापर्यंत सायना वांगला एकदाही हरवू शकलेली नाही.

पहिल्या गेमचा निकाल 20 मिनिटांत
वांगने पहिला गेम अवघ्या 20 मिनिटांत जिंकला. तिने फोरहँड, ओव्हरहेड स्मॅश, नेट ड्रॉप आणि क्रॉसकोर्ट आक्रमणाने सायनावर दबाव कायम ठेवला.
दुसरा गेम अवघ्या 19 मिनिटांत
दुस-या गेममध्ये सायनाने 3-3, 10-10 आणि 12-12 अशी बरोबरी केली. मात्र, यानंतर वांगने 15-13 अशी आघाडी घेतली. यानंतर सलग सहा गुण घेत तिने सायनाचे आव्हान मोडले.
निर्णायक क्षणी हिंमत हरली
पराभवानंतर सायना म्हणाली की, आज माझी सर्व्हिस चांगली झाली नाही. त्यामुळे मला कोर्टवर चपळाई अधिक दाखवून गुण मिळाले तेवढेच. आज निर्णायक क्षणी मी माझा सर्वोत्तम खेळ करू शकले नाही याचे अधिक दु:ख झाले. चारवेळा मी ‘मिसजज’ केले. प्रशिक्षक गोपीचंद सतत सांगत होते, शांत राहा. पण मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही.

वाईट खेळल्याने हरले
या लढतीत खूप वाईट खेळ केल्यामुळे मी हरले. मी खूप जास्त विचार करीत नव्हते. मी शंभर टक्के योगदान देऊ शकले नाही. - सायना नेहवाल, सामन्यानंतरची प्रतिक्रिया.
सायना नेहवालचा सेमीफायनलमध्ये चीनी भिंती'शी लढा
OLYMPIC: विजेंद्र सिंगचा विजय, सुपर सायना उपांत्‍यफेरीत धडक
अंकशास्त्रानुसार सायना, टिंटूला भाग्य साथ देणार