आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC दृष्‍टीक्षेप: इंग्‍लंडला पहिले सुवर्णपदक; फेडरर, सेरेनाची आगेकूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिकमध्‍ये बुधवारच्‍या दिवसाचा थोडक्‍यात आढावा.
यजमान इंग्लंडला पहिले सुवर्ण

लंडन । हेलन ग्लोव्हर व हिदर स्टाननिंगने बुधवारी यजमान इंग्लंडला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. या जोडीने रोइंगच्या महिला दुहेरी गटात ही चमकदार कामगिरी केली. इंग्लंडचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. आतापर्यंत इंग्लंडने 6 पदके मिळवलेली आहेत. या वेळी 7.27.13 मिनिटांत स्पर्धा जिंकून इंग्लंडच्या जोडीने सुवर्णपदक आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियाची होर्नसेक व टॅट या दोघींनी रौप्य तर न्यूझीलंडच्या हॅग व स्कॉवन या जोडीने कांस्यपदक जिंकले.
बास्केटबाल : फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत
लंडन । फ्रान्सच्या महिला संघाने बुधवारी कॅनडाला 64-60 अशा फरकाने धूळ चारून ऑलिम्पिक बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फ्रान्सकडून गोमिसने 16 तर याकोबोयूने 14 बास्केट करून संघाला आघाडी मिळवून दिली. गुर्डानेही 10 बास्केट करून संघाचा विजय निश्चित केला. कॅनडाकडून थोर्बुनने सर्वाधिक 17 बास्केट केले. दुस-या एका सामन्यात चीनने अंगोला संघाला 74-60 ने पराभूत केले.
युक्रेनला रोइंगमध्ये पहिले सुवर्ण
लंडन। युक्रेन संघाने रोइंगमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. 2004 अथेन्स ऑलिम्पिकचा चॅम्पियन जर्मनीला पिछाडीवर टाकून युके्रनने सुवर्णपदक आपल्या नावे केले. यु्रकेनने रोइंगच्या क्वाड स्कल प्रकारात ही ऐतिहासिक कामगिरी केली. सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या जर्मनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेचा संघ तिस-या स्थानावर राहिला. युक्रेनचे चार संघ रोइंगमध्ये सहभागी झाले आहेत.

महिला फुटबॉलः न्यूझीलंडकडून कॅमरूनचा धुव्वा

जेर्जारिस (62, 65 मि.)व स्मिथ (43 मि.) या दोघींनी केलेल्या शानदार गोलच्या बळावर न्यूझीलंडने दुबळ्या कॅमरूनचा 3-1 अशा फरकाने बुधवारी धुव्वा उडवला. या धडाकेबाज विजयासह न्यूझीलंडने ऑलिम्पिकच्या महिला फुटबॉल स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली.
बलाढ्य न्यूझीलंडच्या आव्हानाचा सामना करणा-या कॅमरून महिला संघाने सुरुवातीपासून सावध पवित्रा घेतला. यामुळे न्यूझीलंडचा गोल करण्याचा प्रयत्न चार वेळा अपयशी राहिला. 42 व्या मिनिटांपर्यंत हा सामना 0-0 ने बरोबरी खेळवला गेला. अखेर हेडरने गोल करून स्मिथने ही बरोबरीची कोंडी फोडली. तिने 43 व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून गोलचे खाते उघडले.
या आघाडीला राखून ठेवत न्यूझीलंडने आपला दबदबा कायम ठेवला. त्यानंतर तब्बल 19 मिनिटांनी जेर्जारिसने संघाकडून दुसरा गोल केला. त्यापाठोपाठ त्याने 65 व्या मिनिटात वैयक्तिक दुसरा व संघाकडून तिसरा गोल नोंदवला. 0-3 ने पिछाडीवर असलेल्या कॅमरूनला यलो कार्डमुळे दोनदा धक्का बसला. 21 व 42 व्या मिनिटाला कॅमरूनच्या खेळाडूंना यलो कार्ड मिळाले. अखेर 75 व्या मिनिटाला ओगुने हिने कॅमरूनकडून पहिला गोल केला. न्यूझीलंडच्या संरक्षण फळीने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे कॅमरूनचा हा एकमेव गोल ठरला.

यजमान इंग्लंडकडून ब्राझीलचा पराभव
वेम्बेली या घरच्या मैदानावर तुफानी खेळी करत यजमान इंग्लंडने ब्राझीलचा 1-0 ने फडशा पाडला. इंग्लंडने लढतीच्या अवघ्या दुस-या मिनिटात 1-0 ने आघाडी मिळवली. या आघाडीला शेवटच्या मिनिटांपर्यंत राखून ठेवत यजमान संघाने ब्राझीलचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. दरम्यान, चार वेळा गोलचा केलेला ब्राझीलचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. इंग्लंडकडून हॉगटॉनने एकमेव गोल केला होता.

हैतीच्या खेळाडूचे फेसबुकला साकडे!
लंडन । हैतीचा धावपटू समायर लेने याने फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांच्याकडे भूकंपग्रस्तांकरिता मदत करण्यासाठी साकडे घातले आहे. दोन वर्षांपूर्वी येथे भूंकपात तीन लाखांहून अधिक लोक ठार झाले होते. हैतीचे पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. ‘आशा आहे की, माझे मित्र जुकरबर्ग भूकंपग्रस्तांसाठी आर्थिक मदत करतील. मी व जुकरबर्ग दोघेही एकाच खोलीमध्ये राहत होतो. मी त्याच्या अन्य मित्रांशीदेखील बोलणार आहे,’ असेही लेनेने सांगितले.

हॉकीः ऑस्ट्रेलिया विजयी

ऑस्ट्रेलियाने बुधवारी ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकी स्पर्धेत स्पेनवर 5-0 ने एकतर्फी विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाकडून टुर्नर (39 मि.), फोर्ड (8 मि.), बु्रसरिनी (13 मि.) या तिघांनी आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दिमाखदारपणे आगेकूच केली.
आक्रमक सुरुवात करणा-या स्पेनवर आघाडी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून फोर्ड व बु्रसरिनीने शानदार कामगिरी केली. फोर्डने आठव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत ऑस्ट्रेलियाच्या ब्र्रुसरिनीने दुसरा गोल केला. ओर्चडने 28 व्या मिनिटाला पेनॉल्टी कार्नरवर गोल केला. दुस-या हाफच्या चौथ्या मिनिटाला टुर्नरने स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा व संघाकडून चौथा गोल केला. त्यानंतर ऑकडेनने 68 व्या मिनिटाला पाचवा गोल केला.
हॉलंडने बेल्जियमला हरवले
हॉलंडने बुधवारी दुस-या सामन्यात बेल्जियमचा 3-1 ने पराभव केला. भारताविरुद्धच्या सामन्यातून हॉलंडने ऑलिम्पिकमधील विजयी अभियान सुरू केले होते. वान डेर वीरडन व डे बुग्ड या दोघांनी शानदार गोल केले.

फेडरर, सेरेना जिंकले
लंडन । रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच, सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा या स्टार टेनिसपटूंनी ऑलिम्पिक टेनिस एकेरीतील आपापल्या लढती जिंकून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
फेडररने तिस-या फेरीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला 7-5, 6-3 ने धूळ चारली. जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या लेटन हॅविटवर 4-6, 7-5, 6-1 ने विजय मिळवला. फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाने स्पेनच्या फेलिसियानो लोपेझला 7-6, 6-4 ने नमवले. दुस-या सामन्यात अर्जंेटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोन फ्रान्सच्या सायमन जोएल्सला 6-1, 4-6,6-3 फरकाने पराभूत केले.
महिलांत सेरेना विल्यम्सने वेरा जोनारेवाला 6-1, 6-0 ने पराभूत केले. शारोपाव्हाने इंग्लंडच्या लॉरा रॉबसनला 7-5,6-3ने हरवले. किम क्लिस्टर्सने सर्बियाच्या एना इवानोविचवर 6-3, 6-4 ने मात केली. झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हाने इटलीच्या फ्लाव्हिया पेनेटावर 6-3, 6-0ने विजय मिळवला. रशियाच्या मारिया किरिलेन्कोने जर्मनीच्या ज्युलिया जार्जेसवर 7-6, 6-3ने विजय मिळवला.