आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: इतिहासजमा अन् ऐतिहासिक; पेस-वर्धन जोडीचा पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्ये बुधवारचा दिवसही मोजके खेळाडू वगळता भारतासाठी निराशेचाच ठरला. जिच्याकडून पदकाची सर्वाधिक अपेक्षा होती ती तिरंदाजीतील जगातील नंबर वन खेळाडू दीपिकाकुमारीचे आव्हान पहिल्याच फेरीत इतिहासजमा झाले. दुसरीकडे, बॅडमिंटनमध्ये पी. कश्यप अंतिम आठमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरत ऐतिहासिक कामगिरी केली. याशिवाय बॉक्सर मनोजकुमारने उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. नेमबाजी, हॉकी, तिरंदाजीत पराभवच पदरी पडला. तर पेस-वर्धन या जोडीचाही पराभव झाला. हॉकीमध्‍येही भारतीय संघाला न्‍यूझीलंडने पराभूत केले.

सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताची नंबर वन महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमधील आपली शानदार कामगिरी आणि फॉर्म कायम ठेवला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या सायनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय स्टार खेळाडूने बाद फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या या लढतीत हॉलंडची खेळाडू जी याओ हिला 21-14,21-16 ने पराभूत केले.
सायनाने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करताना विरोधी खेळाडूला त्रस्त करून सोडले. पहिला गेम सायनाने अवघ्या 18 मिनिटांत 21-14 ने जिंकला. दुसरा गेम अवघ्या 20 मिनिटांत आपल्या नावे करून लढत जिंकली. चौथी मानांकित सायनाने 14 वी मानांकित आणि 35 वर्षीय हॉलंडच्या खेळाडूला बॅडमिंटन कोर्टवर चांगलेच पळवले. मोठ्या रॅलीज रंगल्या. यात सायनानेच वर्चस्व राखले. सायनाच्या चपळ खेळापुढे हॉलंडची जी याओ चांगलीच त्रस्त झाली होती. दुस-या गेममध्येही सायनाने आक्रमक खेळ कायम ठेवला. शानदार सर्व्हिस, जबरदस्त ड्रॉप शॉट आणि जोरदार स्मॅश मारून सायनाने लढतीत तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन केले.

पी. कश्यपचा थरारक विजय, आशा पल्लवित

लंडन । भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी आशा सायना नेहवाल असली तरीही पुरुष बॅडमिंटनमध्ये पी. कश्यपनेही आशा पल्लवित केल्या आहेत. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या अंतिम आठमध्ये प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. कश्यपने प्री क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकेच्या निलुका करुणारत्ने याला एका तासाच्या संघर्षपूर्ण लढतीत 21-14, 15-21, 21-9 ने पराभूत केले. कश्यपने पहिला गेम 20 मिनिटांत तिसरा गेम 21 मिनिटांत जिंकला. दुसरा गेम 19 मिनिटांत झाला.
करुणारत्नेविरुद्ध कश्यपचा हा दुसरा विजय ठरला आहे. यापूर्वी स्वीडिश ओपनमध्ये त्याने करुणाला हरवले होते. कश्यपने ड गटात अव्वलस्थान मिळवून बाद फेरीत प्रवेश केला. कश्यपने आक्रमक सुरुवात करताना पहिला गेम जिंकला. मात्र, दुसरा गेम श्रीलंकेच्या खेळाडूने जिंकून सामन्यात पुनरागमन केले. तिस-या गेममध्ये शानदार सर्व्हिस, जबरदस्त ड्रॉप शॉट आणि जोरदार स्मॅश मारून कश्यपने विजय मिळवला. भारतीय ख्ोळाडूने तिसरा गेम 21-9 अशा मोठ्या अंतराने जिंकला. आतापर्यंत दमदार कामगिरी करणा-या कश्यपसमोर उपांत्यपूर्व फेरीत तगडे आव्हान असेल. उपांत्यपूर्व फेरीत त्याला अव्वल मानांकित मलेशियाचा ली चोंग वेईचे आव्हान असणार आहे. लीने इंडोनेशियाच्या सिमोनला पराभूत केले.

मनोजकुमारची आगेकूच
लंडन । भारताचा बॉक्सिंगपटू मनोजकुमारने लाइटवेट (64 किलो) गटाच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मनोजने तुर्कमेनिस्तानच्या सरदार हुडायबर्डला 13-7 ने पराभूत करून ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. लंडन ऑलिम्पिकच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा मनोज भारताचा चौथा बॉक्सिंगपटू ठरला आहे. मनोजने चांगली सुरुवात करताना पहिली फेरी 2-2 ने बरोबरीत सोडवली. दुस-या फेरीत त्याने विरोधी खेळाडूवर हल्ला करताना दे दणादण पंच मारत 7-3 चा स्कोअर केला. तिस-या फेरीतसुद्धा मनोजने तुर्कमेनी बॉक्सरला संधी दिली नाही. तिसरी फेरी त्याने 4-2 ने जिंकत सामना आपल्या नावे केला. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी मनोजला आता शनिवारी यजमान इंग्लंडच्या थॉमस स्टालकरशी झुंजावे लागेल.

पेस-विष्‍णूवर्धन जोडीचा पराभव
टेनिसमध्‍ये पुरुष दुहेरीमध्‍ये भारताची लियांडर पेस आणि विष्‍णूवर्धन या जोडीचा पराभव झाला. फ्रान्‍सच्‍या सोंगा आणि लोड्रा या जोडीने त्‍यांचा 2-1 असा परभव केला. फ्रान्‍सच्‍या जोडीने पहिला सेट 7-6 असा जिंकला होता. परंतु, पेस-वर्धनने दुसरा सेट 6-4 असा जिंकून आव्‍हान दिले. मात्र, तिस-या सेटमध्‍ये त्‍यांना प्रभावी खेळ करता आला नाही. महेश भुपति आणि रोहण बोपाण्‍णा ही भारताची दुसरी जोडी यापूर्वीच स्‍पर्धेबाहेर झाली आहे.


पदकाची प्रबळ दावेदार दीपिकाकुमारी स्पर्धेबाहेर
लंडन । इंग्लंडच्या अ‍ॅमी ऑलिव्हरचा एक तीर चुकल्यानंतर दीपिकाकुमारी जोरात हसली. तिचे हसणे क्षणिक ठरले आणि किताबाची प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या वर्ल्ड नंबर वन दीपिकाला पराभवाचा सामना करावा लागला. अ‍ॅमी ऑलिव्हरने राउंड ऑफ 32 मध्ये दीपिकाला 6-2 ने हरवले. यासह दीपिका ऑलिम्पिकमधून बाहेर झाली. दीपिका पूर्ण सामन्यात एकदाही परफेक्ट टेनचा स्कोअर करू शकली नाही. दुसरीकडे इंग्लंडच्या खेळाडूने, अशी कामगिरी तीन वेळा केली.
दीपिका रँकिंग राउंडमध्ये नवव्या स्थानावर होती. तिच्यासमोर अ‍ॅमी ऑलिव्हरचे आव्हान होते. तिला स्थानिक चाहत्यांचे जोरदार समर्थन मिळाले. पहिल्या सेटमध्ये सेटमध्ये दीपिकाने 8, 9, 9 असे गुण घेतले, तर ऑलिव्हरने 8, 10 आणि 9 चा स्कोअर करून 2-0 अशी आघाडी घेतली.
पहिल्या सेटमध्ये ऑलिव्हरचा स्कोअर 27 आणि दीपिकाचा स्कोअर 26 असा होता.
स्कोअर 1-1 ने बरोबरीत : दुस-या सेटमध्ये दीपिकाने पुनरागमन करताना 9, 8, 9 असे गुण मिळवत 26 चा स्कोअर केला. ऑलिव्हरने या वेळी 9, 9, असा स्कोअर केल्यानंतर तिस-या तीरवर 4 चा स्कोअर केला. यामुळे ऑलिव्हरचा स्कोअर 22 असा झाला.
तिसरा, चौथा सेट ऑलिव्हरच्या नावे : तिस-या सेटमध्ये दीपिकाने 8, 9, 9 चा स्कोअर केला. ऑलिव्हरने सलग तीन 9 मारून 27-26 ने सेट जिंकला. दीपिकाने सामन्यात मागे पडली होती. दीपिकाला चौथा सेट जिंकणे गरजेचे होते. मात्र, भारतीय तिरंदाजाने 8, 9, 9 चा स्कोअर केला, तर ब्रिटिश खेळाडूने 8, 10, 10 चा स्कोअर करून चौथा सेट 28-26 ने जिंकला. भारतीय तिरंदाजांचे आव्हान संपुष्टात : दीपिकाच्या पराभवासह भारताचे तिरंदाजीतील आव्हान जवळपास संपुष्टात आले. भारताच्या तीन पुरुष आणि तीन महिला खेळाडूंनी ऑलिम्पिक तिरंदाजीत सहभाग घेतला होता.

हॉकीत भारताचा 3-1 ने पराभव
लंडन । आठ वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय हॉकी संघाने बुधवारी सलग दुस-या सामन्यातही धूळ चाखली. हॉवर्ड (13 मि.), बुरोवास (24 मि.) व विल्यमसन (29 मि.) या तिघांनी केलेल्या शानदार गोलच्या बळावर न्यूझीलंडने ब गटात भारतावर 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अडचणीत सापडला आहे. न्यूझीलंडचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. यापूर्वीच्या सामन्यात कॅनडाने न्यूझीलंडला पराभूत केले होते.
दमदार सुरुवात करणा-या भारताने लढतीच्या 13 व्या मिनिटात नांग्या टाकल्या. संदीप सिंगने पेनॉल्टी कॉर्नरवर शानदार गोल करून भारताला चौथ्या मिनिटाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती. मात्र, भारताला आघाडीला राखून ठेवता आले नाही. याचा फायदा घेत न्यूझीलंडने पहिल्याच हाफमध्ये सामन्यावर जबरदस्त पकड घेतली. हॉवर्डने पेनाल्टी कार्नरवर गोल करून न्युझीलंडला 13 व्या मिनिटात आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बुरोवास व विल्यमसनने केलेल्या मैदानावर गोलच्या बळावर किवीने पहिल्या हाफमध्ये 3-1 ने मजबूत आव्हान उभे केले. प्रत्युत्तराच्या प्रयत्नात असलेला भारत चार वेळा अपयशी ठरला. दरम्यान, मनप्रीत सिंग व सरदार सिंगला पिवळे कार्ड मिळाले. सलामी सामन्यात भारताला हॉलंडने पराभूत केले होते.


‘नावा’चाच ‘स्वर्ण’सिंह!
लंडन । पदकाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या भारताच्या स्वर्णसिंगने रोइंगच्या पुरुष एकेरी स्कलच्या 16 व्या पोझीशनची अंतिम फेरी गाठली. बुधवारी एटान डार्नी येथे आयोजित तिस-या उपांत्य सामन्यात त्याने दुस-या स्थानावर धडक मारली. या वेळी 500 मीटरचे अंतर त्याने 7 मिनिटे 36.25
सेकंदात पूर्ण केले. मात्र, 2000 मीटरच्या स्पर्धेत तो चौथ्या स्थानावर राहिला होता. या वेळी त्याच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. गुरुवारी त्याला 13 ते 18 स्थानासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. दुहेरी स्कलमध्ये संदीप व मंजितसिंह चौथी उपांत्य स्पर्धा शनिवारी खेळणार आहे.

राहीवर पराभवाची नौबत
लंडन । नेमबाज राही सरनोबत आणि अन्नूराजसिंग यांचा ऑलिम्पिक प्रवास संपुष्टात आला. बुधवारी रॉयल आर्टिलरी बॅरेक्स येथे 25 मी. पिस्तूल नेमबाजी स्पर्धेच्या क्वालिफिकेशनमध्ये राही 19 व्या, तर अन्नू 30 व्या स्थानी आली. यामुळे त्यांना फायनलमध्येसुद्धा प्रवेश करता आला नाही. राहीने प्रिसिशन राउंडमध्ये 291 आणि रॅपिडमध्ये 288 असे एकूण 579 गुण मिळवले. दुसरीकडे अन्नूने प्रिसिशन आणि रॅपिडमध्ये अनुक्रमे 286 आणि 286 गुण मिळवत एकूण 575 गुणांची कमाई केली. फायनलसाठी ही कामगिरी पुरेशी ठरली नाही.
ऑलिम्पिक डायरीः आयोजकांची गोची
भूपतीचे हताश उद्गारः शेवटची ऑलिम्पिक खेळलो, गुडबाय!
PHOTOS: ऑलिम्पिक खेळाडूंचे अनोखे टॅटू...पाहातच राहाल!
फेल्प्स ऑलिम्पिकचा महानायक