आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics 2012: So Far, Doping Cases Are Good News ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकला नाही ‘डोपिंग’चा कलंक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिक स्पर्धेचा मध्य होईपर्यंत अद्याप तरी एकही प्रत्यक्ष स्पर्धेत उतरलेला खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये ‘पॉझिटिव्ह’ आढळून आला नसल्याचे ऑलिम्पिक आयोजन समितीच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आले आहे.
अर्थात ही केवळ रविवारपर्यंतची स्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आयोजकांच्या वतीने प्रत्येक खेळाडू आणि संशयित भासणा-यांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. त्यामुळे लंडन ऑलिम्पिक स्वच्छ राखण्यात यश आले असल्याचा आयोजकांचा दावा आहे. यापुढचे बहुतांश सामने हे आता पदकासाठीचेच असल्याने यापुढील टेस्ट तर अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक ठरणा-या आहेत. या टेस्टमध्ये कुणी पॉझिटिव्ह सापडला तर त्याचे थेट पदकच काढून घेतले जात असल्याने त्या टेस्ट अत्यंत काळजीपूर्वक आणि पुन्हा - पुन्हा केल्या जातात. खेळाडूंची सॅम्पल्स घेतानादेखील ती दोन ठिकाणी घेऊन ती खेळाडूसमोरच सील करताना दोन्हींवर त्या खेळाडूच्या सह्या घेतल्या जातात. त्यामुळे एका सॅम्पलमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह ठरला आणि त्यानंतर त्याने ते नाकारले तर त्याच्यासमोर तसेच अन्य पंचांच्या पॅनलसमोर दुसरे सॅम्पल उघडून ती टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध केले जाते. त्यानंतर त्या खेळाडूला बाद ठरवून ते पदक त्यानंतरच्या दुस-या खेळाडूला दिले जाते. त्याबाबत संबंधित खेळाडू स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथील ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात हरकत घेऊ शकतो.
स्पर्धेपूर्वीच्या सहा महिन्यांत 107 पॉझिटिव्ह - ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंच्या चाचण्या सहा महिने आधीपासूनच घेण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये तब्बल 107 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचे नाव तिथेच बारगळले. तर लंडनमध्ये महिनाभर आधी दाखल झालेल्या खेळाडूंच्या करण्यात आलेल्या टेस्टपैकी रशिया, कोलंबिया, उझबेकिस्तान, मोरक्को आणि अल्बेनियाच्या प्रत्येकी एक प्रमाणे 5 खेळाडूंच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बाद ठरवण्यात आले होते.
अत्याधुनिक उपकरणांचा धाक - अत्याधुनिक उपकरणांसह त्यापेक्षाही दक्ष कर्मचा-यांमुळे येथील लॅब सुसज्ज आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा धाक डोपिंग करणा-या किंवा करू इच्छिणा-या खेळाडूंच्या मनात निर्माण झाला असल्यानेच स्पर्धा सुरू झाल्यापासून एकही कलंकित खेळाडू सापडलेला नसल्याचे प्रवक्ता मार्क अ‍ॅडम्स यांनी सांगितले.