आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकाम्या हाताने ऑलिम्पिकमधून परतणार नाही- बॉक्सर विजेंदरचा निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सात बॉक्सरचा भारतीय संघ निश्चितपणे पदक मिळवणार आहे. या स्पर्धेतून रिकाम्या हाताने न परतण्याचा निर्धार बीजिंग ऑलिम्पिक कांस्य विजेत्या विजेंदरने केला आहे. येथील एनआयएसच्या कार्यक्रमात तो उपस्थित होता. आम्ही सकारात्मक विचार समोर ठेवून ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. चाहत्यांच्या आशा-अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, असेही त्याने सांगितले.
‘मला आशा आहे की, लंडन येथील स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवू. आम्हाला देशाने भरपूर काही दिले आहे. आता आम्हीही देशाला पदके मिळवून देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे, असे मत रवी कुमारनेही व्यक्त केले. भारताचे 7 बॉक्सर ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या वेळी एनआयएसचे कार्यकारी संचालक एल.एस.राणावत यांनी लंडन येथील स्पर्धेत सहभागी होणा-या संघाला शुभेच्छा दिल्या. ‘ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण करणा-या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. तिकीट निश्चित करून तुम्ही सर्वांनी मोठे कार्य केले आहे.मात्र, त्याचबरोबर तुमच्यावर जबाबदारी देखील वाढली आहे. सर्वाधिक पदके मिळवण्याच्या आशाही आता उंचावल्या आहेत,असे मत राणावत यांनी मांडले.
गुरबक्ष सिंग संधू होणार निवृत्त- दोन दशकापासून भारतीय बॉक्सरला प्रशिक्षण देणारे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करणार आहेत. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2008 ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पदक मिळवले होते. 1993 मध्ये संधू हे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. या दरम्यानच्या काळात भारतातील बॉक्सिंगचे रूप पालटले आहे. ‘ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 7 बॉक्सर सहभागी होणार आहेत. सर्वच प्रतिभावंत खेळाडू आहेत. मी पुढच्या वर्षी 60 वर्षांचा होणार आहे. हे सर्वच जण पदके मिळवून माझा 60 वा वाढदिवस साजरा करतील. माझ्यासाठी हीच मोठी गुरुदक्षिणा असणार आहे, असा विश्वास संधू यांनी व्यक्त केला.