आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिकचे क्रीडाग्राम आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित घडामोडी पूर्व लंडनमध्ये घडत असल्याने सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि अन्य लंडनवासीदेखील पूर्व लंडनकडेच धावत असल्याने सेंट्रल लंडन हे ‘घोस्ट टाऊन ’ अर्थात भुतांचे शहर बनले असल्याचे लंडनच्या टॅक्सीचालक संघटनेचे सचिव स्टीव्ह मॅकनमारा यांनी म्हटले आहे.
सध्याचे व्यवसायाचे दिवस पाहता आमचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा 40 टक्के कमीच झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमचे जवळपास 90 टक्के ग्राहक लंडननिवासीच असतात. मात्र त्या सगळ्यांनी जणू सेंट्रल लंडन सोडून पूर्व लंडनलाच मुक्काम केला असल्यासारखेच आम्हाला वाटू लागले आहे. त्यात त्यांची भर पर्यटकांकडून काढली गेली नाही. त्यामुळेच व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला असल्याचे स्टीव्ह यांचे म्हणणे आहे. देशात आलेले सर्व पर्यटक कसे फिरतायत आणि काय करत आहेत, तेच आम्हाला समजत नाही. मात्र या सर्व प्रकारामुळे सेंट्रल लंडन हे भुतांचे शहर बनले आहे हे मात्र निश्चित. लंडन बघायला येणारे पर्यटक हे आता प्रामुख्याने ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक झाल्यानंतरच येणार असल्याने त्यांच्याकडून निदान पुढचे दोन - तीन महिने व्यवसायाची अपेक्षा करणे शक्य नसल्याचेही स्टीव्ह यांनी नमूद केले.
गतवर्षापेक्षा हॉटेल्समध्ये गर्दी कमी
मागील वर्षी याच मोसमात झालेली पर्यटकांची गर्दी आणि सध्याच्या मोसमातील हॉटेल्समधील पर्यटकांची संख्या पाहता त्यात घटच असल्याचे जॅकट्रॅव्हल हॉटेल रूम पुरवणाºया कंपनीची प्रमुख अ‍ॅँजेला स्केली हिचे म्हणणे आहे. मागील वर्षी युरोपमधील इतर देशांमध्ये झालेल्या हॉटेल्सच्या बुकिंगपेक्षाही लंडनमध्ये झालेले बुकिंग जास्त होते. त्या तुलनेत यंदा अन्य देशांमधील हॉटेल्सच जास्त व्यवसाय करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उत्तरार्धात मिळेल अधिक प्रतिसाद
प्रारंभीच्या टप्प्यात अत्यल्प प्रतिसाद असला तरी उत्तरार्धात चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचे पर्यटन विभागाचे प्रवक्ता मार्क टोरो यांनी सांगितले. ज्या देशांमध्ये आणि महानगरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होतात, त्या वर्षी तेथील अर्थव्यवस्थांना फटका बसतो, हा नेहमीचा अनुभव या ऑलिम्पिकपासून आपल्याला बदलायचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लंडन आणि परिसरातील हॉटेल्स सुमारे 80 टक्के भरली असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले आहे. अनेक पर्यटकांनी हॉटेल्सपेक्षा येथील स्थानिक नागरिकांच्या मोठ्या अपार्टमेंटमधील घरांनाच पसंती दिल्याने हा काहीसा फरक पडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एक अब्ज पाउंडची अतिरिक्त उलाढाल
ऑलिम्पिकमुळे लंडनसह संपूर्ण परिसरात होणाºया उलाढालीत तब्बल एक अब्ज पाउंड (1 पाउंड = सुमारे 87 रुपये ) इतकी अतिरिक्त उलाढाल होण्याची ब्रिटिश शासनाला आशा आहे. ऑलिम्पिक भरवण्यासाठी तब्बल 9.3 अब्ज पाउंड इतका खर्च झाला असून त्यापेक्षा अधिक रकमेची उलाढाल होणार असल्याचा शासनाला विश्वास वाटतो. त्यामुळेच यंदाच्या ऑलिम्पिकपासून स्पर्धा भरवणारा देश घाट्यात राहिल्याचा ठपका पुसला जाईल, असा ब्रिटिश शासनाचा दावा आहे.
पर्यटक आणि वाहतुकीसाठी खुले
लंडन या शहराला खूप मोठी परंपरा आणि अनेक आकर्षणे आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या मोसमात लंडन शहरालादेखील भेट देऊन शहराच्या सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केले आहे. तसेच शनिवारपासून लंडनमधील प्रत्येक भाग गजबजून गेलेला असेल असा विश्वास लंडनचे वाहतूक आयुक्त पीटर हेंडी यांनी व्यक्त केला. आधी शहराच्या मध्यवर्ती भागावर ताण येऊ नये म्हणून वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र सर्वच व्यावसायिकांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवल्याने ही बंदी हटवून पर्यटक आणि वाहतुकीसाठी हा भाग खुला करण्यात आला आहे.
PHOTOS: लंडन ऑलिम्पिकमधील काही हटके आणि आकर्षक नजारे...
लंडन आयः शूटिंगची अनेक ‘टार्गेट्स’