आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी टेनिस स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल - महेश भूपती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टेनिसमधील सर्वात खडतर दुहेरी स्पर्धेचे आव्हान ऑलिम्पिक स्पर्धांमध्येच असते. प्रत्येक स्पर्धक आपल्या देशाला अधिकाधिक पदके मिळावी यासाठी खेळत असतो. त्यामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळाडू एकेरीवर लक्ष केंद्रित करतात. दुहेरीत त्यांना फारसा रस नसतो. या उलट ऑलिम्पिकमध्ये एकेरीचे आणि दुहेरीचे पदक पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू झटत असतो. एकेरीत हरल्यानंतर तर तो खेळाडू दुहेरीवर एवढे लक्ष केंद्रित करतो, की पहिली फेरीदेखील अंतिम फेरीसारखी असते. असे भारतीय टेनिस संघाच्या पदकाच्या आशा अवलंबून असलेल्या महेश भूपतीने येथे सांगितले. तो ओमेगा या ऑलिम्पिकच्या अधिकृत 'टाइम किपर' यंत्रणा पुरवणार्‍या कंपनीतर्फे भारतीय टेनिसपटूंना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आयोजित समारंभात बोलत होता.
महेश भूपती पुढे म्हणाला, 'दुहेरीतील जबरदस्त स्पर्धेचा फटका आम्हाला बीजिंग ऑलिम्पिकला बसला होता. एकेरीत पराभूत झाल्यामुळे रॉजर फेडररने दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आमची विजयी घोडदौड अल्पावधीत संपली होती.'
बोपन्नाबाबतच्या प्रश्नावर भूपती म्हणाला, 'गेले 7-8 महिने मी बोपन्नाबरोबरच खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत खेळण्याचा सध्या माझा सराव आहे. अशा वेळी ज्याच्यासोबत सरावात आहे त्याच्यासोबत खेळणे हेच शहाणपणाचे असते.'
ऑलिम्पिक ही सर्वोच्च क्रीडा स्पर्धा आहेत. अशा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा मी माझा बहुमान समजतो. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी अधीर झालो आहे, असेही तो म्हणाला.
ध्वजधारकाचा निर्णय येत्या दोन दिवसांत- आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजधारक कोण असेल, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघाचे काळजीवाहू अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी दिली. यासाठी बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता व देशाचा पहिला वर्ल्ड चॅम्पियन सुशील कुमार प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, यासाठी अजून चार जण स्पर्धेत आहेत. ध्वजधारकाच्या यादीमध्ये सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, बॉक्सर विजेंदर कुमार, टेनिसपटू लिएंडर पेस व कुस्तीपटू सुशील कुमार यांचा समावेश आहे. या सर्वांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. या चौघांनी देशाला ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून दिले आहे.