आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डी मास्टर्स दुबईत 22 जूनपासून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतातील प्रो कबड्डी लीगच्या यशानंतर आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेनेही त्यापासून बोध घेत, यंदापासून ‘कबड्डी मास्टर्स’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाची स्पर्धा दुबईमध्ये २२ जून ते ३० जून या कालावधीत होत आहे. या स्पर्धेचा कार्यक्रम असा आहे. थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट््सवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे.  


भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया, केनिया व अर्जेंटिना अशा सहा संघांमध्ये साखळी व नंतर बाद पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. मात्र अशा स्पर्धांचे अन्य देशांमध्येही आयोजन करून कबड्डी या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रवेश व्हावा यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले.  
चतुर्वेदी पुढे म्हणाले, ‘ही स्पर्धा म्हणजे कबड्डी या खेळाच्या ऑलिम्पिक प्रवेशासाठीची सुरुवात आहे. जगात सर्वत्र अशा स्पर्धांचे आयोजन करून अधिकाधिक देशांना त्यात सहभागी करून घेतले जाईल. त्यामुळे या स्पर्धेचे ठिकाण एकच नसेल तर अनेक देशांकडे या ‘कबड्डी मास्टर्स’चे यजमानपद जाईल. सलामीची ‘मास्टर कबड्डी’ दुबई स्पोर्ट््स कौन्सिल स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे.  


२०१६च्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत कोरियन संघाने भारताला सलामीलाच पराभूत करून खळबळ उडवली होती. या वेळी मात्र कोरियाचा संघ वेगळ्या गटात असल्याने भारताला चिंता नाही. प्रत्येक गटातील २-२ संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. त्यानंतर बाद फेरीची सामने होतील. कबड्डी मास्टर्स स्पर्धेमुळे जगातील चार बलाढ्य संघांशी दोन हात करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आम्ही सध्या कुठे आहोत आणि जगात कबड्डी या खेळाची किती प्रगती झाली आहे तेही कळेल, असे भारतीय संघांचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले. 

 

भारत-पाकिस्तान समोरासमोर
अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली भारताने संघ जाहीर केला असून सलामीलाच आशिया खंडातील प्रमुख प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान भारताला पेलावे लागणार आहे. भारताच्या ‘अ’ गटात पाकिस्तानसह केनियाचा समावेश आहे. ‘ब’ गटात इराण व कोरिया या दोन बलाढ्य संघांसह अर्जेंटिनाचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...