Home | Sports | Other Sports | England vs Belgium, FIFA World Cup third place play-off

बेल्जियमला अद्याप सर्वाेत्तम कामगिरीची संधी; इंग्लंड पहिल्यांदा तिसरे स्थान गाठण्यास उत्सुक

वृत्तसंस्था | Update - Jul 14, 2018, 09:24 AM IST

फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशात माजी चॅम्पियन इंग्लंड अाणि बेल्जियम संघ सपशेल अपयशी ठर

 • England vs Belgium, FIFA World Cup third place play-off

  सेंट पीटर्सबर्ग- फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशात माजी चॅम्पियन इंग्लंड अाणि बेल्जियम संघ सपशेल अपयशी ठरले. या दाेन्ही बलाढ्य संघांना उपांत्य फेरीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे किताबाचे स्वप्न भंगले. मात्र, अाता स्पर्धेत तिसरे स्थान गाठण्याची संधी अाता दाेन्ही संघांना अाहे. शनिवारी सेंट पीटर्सबर्गच्या मैदानावर इंग्लंड अाणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार अाहे. हे दाेन्ही संघ तिसऱ्या स्थानासाठी समाेरासमाेर असतील.


  १९६६ च्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा अंतिम फेरीतील प्रवेशाचा प्रयत्न अपुरा ठरला. या टीमला क्राेएशियाने पराभूत केले. अाता इंग्लंड संघ पहिल्यांदा अापल्या करिअरमध्ये तिसऱ्या स्थानासाठी झुंजणार अाहे. या संघाला १९८६ च्या विश्वचषकात चाैथ‌े स्थान मिळाले हाेते. मात्र, अाता यात प्रगती साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. यासाठी इंग्लंड संघाला अव्वल कामगिरीची गरज अाहे. कारण, टीमसमाेर बेल्जियमचे तगडे अाव्हान असेल.


  गत विजयाने बेल्जियम संघाचा दावा मजबूत
  यंदाच्या विश्वचषकात इंग्लंड अाणि बेल्जियम संघ जी या एकाच गटात हाेते. त्यामुळे या दाेन्ही संघात गटातील सामना रंगला. यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमचे वर्चस्व राहिले. या संघाने १-० ने हा सामना जिंकला. त्यामुळे पुन्हा एकदा सरस कामगिरी करत विजयाचा कित्ता गिरवण्याचा बेल्जियम संघाचा प्रयत्न असेल. या टीमचे खेळाडू या सामन्यात लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहेत. अटॅकिंग पाॅवरच्या बळावर हा सामना जिंकण्याचा बेल्जियमचा प्रयत्न असेल. बेल्जियम सर्वाेत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला अाहे. या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत बाजी मारल्यास बेल्जियमला इतिहासात सर्वाेत्कृष्ट कामगिरीची नाेंद नावे करता येईल.


  इंग्लंड संघाने जिंकले २२ पैकी १५ सामने
  - बेल्जियमने गटात मात दिली असली तरी,हेड टू हेडमध्ये इंग्लंड संघ वरचढ ठरला अाहे. अाता हीच लय कायम ठेवण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असेल.
  - दाेन्ही संघात २२ सामने झाले. यातील १५ सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला. तसेच तीन सामने बेल्जियमने जिंकले. चार सामन्यांत दाेन्ही संघांनी बराेबरी साधली.


  १६ वर्षांनंतर २ संघ दाेन वेळा एकाच वर्ल्डकपमध्ये समाेरासमाेर
  - फिफा वर्ल्डकपमध्ये १६ वर्षांनंतर दाेन संघ एकाच स्पर्धेत दाेन वेळा समाेरासमाेर येण्याचा अनाेखा याेग जुळून अाला अाहे. यापूर्वी २००२ च्या विश्वचषकात ब्राझील अाणि तुर्की संघात असा याेग जुळून अाला हाेता. या दाेन्ही संघात लीगचा पहिला सामना अाणि उपांत्य सामना रंगला हाेता.
  - सध्याचे प्रशिक्षक मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनात बेल्जियमने २६ पैकी केवळ दाेनच लढतीत पराभवाचा सामना केला. एक २०१६ मध्ये स्पेनविरुद्ध २-० ने व दुसरा फ्रान्सविरुद्ध यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात १-० ने पराभव झाला.
  - मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली राेमेलु लुकाकूने बेल्जियमसाठी २३ सामने खेळले अाहेत. यात त्याच्या नावे २३ गाेलची नाेंद अाहे. मात्र, मागील तीन सामन्यांत त्याला एकही गाेल करता अाला नाही. ताे मागील चार सामन्यांपासून गाेल करण्यात अपयशी ठरत अाहे. मात्र, अाता अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा त्याचा मानस अाहे.

Trending