Home | Sports | Other Sports | On the eighth day of the Commonwealth Games, India has won 7 medals

बीडच्या राहुल आवारेला सुवर्णपदक; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारताला 7 पदके

दिव्‍य मराठी | Update - Apr 13, 2018, 03:04 AM IST

बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा मराठमोळा पहिलवान राहुल आवारेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी इतिहास घडवत सुवर्णपदक पटका

 • On the eighth day of the Commonwealth Games, India has won 7 medals

  गोल्डकोस्ट- बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा मराठमोळा पहिलवान राहुल आवारेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी इतिहास घडवत सुवर्णपदक पटकावले. राहुलने पुरुष गटात ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कुस्तीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीला १५-७ अशी धूळ चारली. त्याचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.


  १९ मिनिटांत सुवर्ण
  राहुलने पहिला सामना ५ मिनिटांत, दुसरा २ मिनिटे, तिसरा व चौथा ६-६ मिनिटांत जिंकला. म्हणजेच त्याने एकूण १९ मिनिटांत सुवर्ण जिंकले.


  पोटाला दुखापत, उपचार घेऊन परतला अन््् जिंकला
  फायनलमध्ये कॅनडाच्या स्टीव्हनविरुद्ध चौथ्या मिनिटाला राहुलच्या पोटात दुखापत झाली. खेळ थांबवावा लागला. राहुलने २ मिनिटांचा मेडिकल टाइमआऊट घेतला. उपचार घेतले. परत मॅटवर आला आणि अवघ्या चारच मिनिटांत निकाल लावला.


  सेमीफायनलमध्ये पाकच्या पहिलवानाला लोळवले
  राहुलने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्ज रॅम, पुढील लढतीत ऑस्ट्रेलियाच्या थॉमनसला हरवले. सेमीफायनलमध्ये लढत पाकिस्तानच्या मोहंमद बिलालशी होती. स्कोअर ४-४ असा होता. राहुलने मुळी डाव लावून तो १०-४ असा केला. शेवटपर्यंत ही बढत कायम ठेवली.


  सलग ३ सामन्यांत ‘मुळी डाव’ लावून जिंकले सोने
  - राहुलने क्वॉर्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये मुळी डावाने प्रतिस्पर्ध्याला चीत केले.
  मुळी डाव : या डावात विरोधी मल्लाच्या पायाची कैची करून त्याला दोन्ही हातांनी आवळून फिरवले जाते. यामुळे त्याला सावरण्याचा वेळच मिळत नाही आणि तो चीत होतो. याला अँकललेस किंवा मुळी डाव म्हटले जाते.
  बचाव : या डावातील बचावात मल्ल आपले पाय मागच्या बाजूला खेचतो आणि दोन्ही पट वाचवतो. स्पर्धक मल्ल तो उलटवण्याचा प्रयत्न करत असेल तर विजेता मल्ल जोर लावून स्वत:ला वाचवतो.
  विशेष : २०१२ ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने याच डावाने कांस्य जिंकले होते.


  सुशीलकुमारची हॅट््ट्रिक
  - भारताच्या सुशीलकुमारने ७४ किलो फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याआधी त्याने २०१४ व २०१० मध्येही सुवर्ण जिंकले होते. सुशीलने फायनलमध्ये द. अाफ्रिकेच्या जोहानस बोथाला केवळ ८० सेकंदांतच लोळवले.
  - बबिताकुमारीने ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये राैप्य व किरणने ७६ किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्य जिंकले.
  - थाळीफेकीत कृष्णा पुनियाने रौप्य, तर नवजीत ढिल्लनने कांस्य जिंकले.

  महाराष्ट्राच्या तेजस्विनीला नेमबाजीत रौप्यपदक
  नेमबाज तेजस्विनी सावंत हिने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.


  अप्पा संधी गमवायची नव्हती, जिद्दीनं खेळलाे बघ : राहुल
  राहुलचा धाकटा भाऊ गोकुळही उत्कृष्ट मल्ल असून त्याने फोनवर खास ‘दिव्य मराठी’साठी राहुलची मुलाखत घेतली. यात राहुलने देशासाठी सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्षेतून मैदानात उतरलो होतो, असे स्पष्ट केले. कुस्तीला आयुष्य वाहिलेल्या या भावंडांचा हा सुखसंवाद चांगलाच रंगला. तो अगदी त्यांच्याच शब्दांत..!


  गोकुळ : नाना अाता कसं वाटतंय?
  राहुल : अप्पा, तुला तर माहितीये, २०१४ नंतर कुस्तीला रामराम करायचा विचार सतवायचा. अन्् अाॅलम्पिकची संधी गेल्यावरही खूप दु:ख झालं हाेतं. अाई, अाबांनाही माझी चिंता वाटायची. पण त्यांनी कधीच मला खचू दिलं नाही. अाबानं तालीम उभी केली. कुस्तीचा ध्यास घेतला. ताे ध्यासच मला इथवर घेऊन अालाय बघ. हरिश्चंद्र बिराजदार मामाचं पण स्वप्नं पूर्ण झालं.

  गोकुळ : ‘कुस्ती एके कुस्ती’ कामी अाली ना...
  राहुल :
  खरंय बघ. दिवसाला सात तास सराव केला तरी कमीच वाटायचा. अाखाड्यात समाेरचा कुठला दाव मारंल या विचारानंच अाणखी कसरत करावी वाटायची.

  सकाळ, संध्याकाळ अाखाड्यात काढल्यावर सुखानं झाेप लागायची. तुला तर माहितीये, कुस्तीसाठी चार महिने एक वेळ जेवलाे हाेताे. कुस्तीसाठी काय नाही केलं बघ.
  गोकुळ: अाखाड्यात उतरल्यावर अापली तालिम अाठवली का?
  राहुल :
  हाे. तालमीत केलेला सराव अाठवला. काही झालं तरी गाेल्ड मेडल मिळवत मैदान मारायचंच हा विचार पक्का हाेता. दाेनदा चान्स गेल्यानं अाता संधी जाऊ द्यायची नाही हे मनाशी पक्कं हाेतं बघ.
  गोकुळ: गावची अाठवण अाली का?
  राहुल:
  मग राजा. गावाला विसरून कसं चालेल? भरभरून प्रेम दिलंय गावानं. या गावातच माेठा झालाे. तुला तर माहितीय अापलं गाव हिच अापली ताकद. इकडं अाल्यावरही गावची अाठवण मनातून जात नाही.
  गोकुळ: अाता संकुल उभारणार का?
  राहुल :
  अाबानं १८ वर्ष तालिमीत घालवली. अापल्यासगट अनेकांना कुस्ती शिकवली. अाता अाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. तालिम अाता कुस्ती संकुल करायची.
  गोकुळ: नाना अाता अाॅलम्पिकची तयारी?
  राहुल :
  अप्पा अापल्या मातीत खूप गुणवत्ता अाहे. फक्त अापल्या पाेरांना मार्गदर्शनाची गरजय बघ. तब्येतीनं साथ दिली तर अाॅलम्पिकही मारू की. अाता मिशन अाॅलम्पिक.
  शब्दांकन - दिनेश लिंबेकर

Trending