आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्मिंगहॅम राष्ट्रकुलवर बहिष्कार नाही : बत्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके मिळवण्याचा प्रमुख क्रीडा प्रकार नेमबाजीला अागामी २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून वगळण्यात आल्यामुळे भारतीयांना संताप येणे साहजिकच आहे; मात्र त्यावर त्या स्पर्धांवर बहिष्कार टाकणे हा योग्य पर्याय नाही, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा यांनी स्पष्ट केले. गेले दोन दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक भारताच्या दौऱ्यावर होते.

 

त्या वेळी त्यांनीही यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक या स्पर्धा वेगळ्या आहेत आणि या दोन खेळांचे आयोजन करणाऱ्या संघटनाही वेगळ्या व स्वायत्त संस्था आहेत. त्यामुळे आयओसी यासंदर्भात राष्ट्रकुल क्रीडा संघटनेला कोणताही आदेश अथवा सूचना करू शकत नाही हे स्पष्ट केले.  


राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारताने २०१० व २०१४ च्या स्पर्धांमध्ये १४ सुवर्णपदकांसह ३० पदके पटकावली होती. गोल्डकोस्ट येथील स्पर्धेत तर भारताच्या एकूण ६६ पदकांपैकी १६ पदके (७ सुवर्णपदके) भारतीय नेमबाजांनी पटकावली होती.  


खरे तर बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडा प्रकार समाविष्ट करू शकत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. तरीही सहानुभूती व वातावरणनिर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणधीरसिंग यांनी बहिष्काराची हाक दिली होती. त्यांनी क्रीडामंत्री राजवर्धन राठोड, जे स्वत: एक नेमबाज आहेत त्यांनी आणि आयओएला बर्मिंगहॅम स्पर्धांमध्ये भारताचा संघ पाठवू नये असे आवाहन केले होते.  

 

भूमिकेशी असहमत 

आयओएचे अध्यक्ष डॉ. बत्रा यांनी म्हटले आहे की, रणधीरसिंग यांचा त्रागा आपण समजू शकतो. मात्र त्यांच्या बहिष्काराच्या भूमिकेशी मी सहमत नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पर्यायी खेळांपैकी एक खेळ असलेल्या खेळाला वगळल्यामुळे एवढे ताणून धरणेदेखील योग्य नाही. १० अनिवार्य क्रीडा प्रकारांसह, ७ पर्यायी खेळांपैकी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीने ज्युदो, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, डायव्हिंग, सायकलिंग व  बास्केटबॉल या खेळांची निवड केली. बर्मिंगहॅममध्ये शूटिंग रेंज नाही.  शूटिंग रेंज  २५० किमी दूरवर असल्यामुळे त्यांनी नेमबाजी खेळाला वगळण्याचा निर्णय घेतला होता.

 

बातम्या आणखी आहेत...