आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांनी कुस्तीपटू सतीशकुमारला न्याय! दिल्लीच्या न्यायालयाचा निर्दोष असल्याचा निर्वाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली -  भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) प्रतिबंधित औषध सेवन करून डोपिंग केल्याच्या चुकीच्या माहितीच्या आधारे कुस्तीपटू सतीश कुमारला २००२ मध्ये १४ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले होते. दिल्लीच्या न्यायालयाने त्याला तब्बल १५ वर्षांनंतर निर्दोष सोडत न्याय दिला. कुस्ती महासंघाच्या चुकीमुळे या कुस्तीपटूची कारकीर्द संपुष्टात आली. त्याच्या चारित्र्यावर डोपिंगचा डाग लागला होता, आता तो दूर झाला आहे.   
 
पंजाबच्या या मल्लाचे आणि पश्चिम बंगालच्या मल्लाचे नाव सारखेच असल्याने गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे सतीशला बुसान येथे आशियाई स्पर्धेला जाण्यापासून रोखण्यात आले. पश्चिम बंगालचा तो मल्ला डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. न्यायालयाने सतीशला न्याय तर दिलाच, मात्र याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाला दोषीदेखील ठरवले आहे.
 
न्यायालयाने तिखट प्रतिक्रिया देत खेळाचे जाणकार नसलेले संघटनेचे पदाधिकारी खेळाडूंसोबत असा व्यवहार करतात. महासंघाला दोषी ठरवताना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरिंदर एस. राठी यांनी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत आणि अन्य खेळाडूला सतीशप्रमाणे अपमान सहन करावा लागू नये, असेही न्यायालयाने म्हटले. या मल्लाने २००६ मध्ये राष्ट्रकुल व जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले हाेते. 
 
२५ लाख रुपये मोबदला मिळणार
न्यायालयाने  सतीशच्या बाजूने निर्णय देताना भारतीय कुस्ती महासंघाने २५ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने या प्रकरणात खेळाडूवर अन्याय करणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाला दोषी ठरविले आहे. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांना फटकारलेदेखील. कुस्तीपटूला एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्याची ही पहिलीच घटना आहे.
बातम्या आणखी आहेत...