न्यूयॉर्क - जगातला तिसर्या क्रमांकाचा खेळाडू इंग्लंडच्या अँडी मरेचा वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा अमेरिकन ओपनमध्ये धक्कादायक पराभव झाला आहे. त्याला १५ वा मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने ४ तास आणि १८ मिनिटे चाललेल्या प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यात पराभूत करून मोठा विजय मिळवला. याशिवाय १७ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता स्विसकिंग रॉजर फेडरर तसेच फ्रेंच ओपन चॅम्पियन स्टेनिसलास वावरिंका यांनी सुद्धा
आपापले सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
अँडरसनने मरेला ७-६, ६-३, ६-७, ७-६ ने पराभूत केले. त्याने आठ प्रयत्नानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीचा अडथळा दूर केला आहे. अँडरसनने मरेविरुद्ध शानदार प्रदर्शन करताना २५ ऐस मारले. अँडरसनचा यापूर्वी सात वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभव झाला आहे. आपल्या जोरदार सर्व्हिससाठी प्रसिद्ध असलेल्या अँडरसनला आता क्वार्टर फायनलमध्ये पाचवा मानांकित स्वित्झर्लंडच्या एस. वावरिंकाशी लढायचे आहे. वावरिंकाने अमेरिकेचा युवा खेळाडू डोनाल्ड यंगला ६-४, १-६, ६-३, ६-४ ने हरवले.
फेडररची आगेकूच
इतर एका प्री क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड नंबर २ स्वित्झर्लंडच्या फेडररने १३ वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नरला ७-६, ७-६, ७-५ ने मात दिली. या विजयासह फेडररने अंतिम आठमध्ये प्रवेश केला. आता फेडररचा पुढचा सामना १२ वा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी होणार आहे. त्याने सहावा मानांकित चेक गणराज्यच्या थॉमस बर्डिचला चार सेटमध्ये चाललेल्या सामन्यात २-६, ६-३, ६-४, ६-१ ने हरवले.
क्वितोवा, हालेप क्वार्टर फायनलमध्ये दाखल
दुसरीकडे महिला गटात चौथ्या फेरीत पाचवी मानांकित पेत्रा क्वितोवा, २६ वी मानांकित फ्लाविया पेनेटा, दुसरी मानांकित रोमानियाची सिमोना हालेप तसेच २० वी मानांकित बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पायाच्या दुखापतीतून सावरताना सिमोना हालेपने जबरदस्त गर्मीत जर्मनीची खेळाडू तसेच २४ वी मानांकित सबाईन लिसिकीला २ तास ३८ मिनिटांत ६-७, ७-५, ६-२ ने हरवले. इटलीच्या पेनेटाने २०११ ची यूएस ओपन चॅम्पियन इंग्लंडच्या जोहाना कोंटाला ७-५, ६-३ ने पराभूत करून आगेकूच केली. व्हिक्टोरिया अझारेंकाने अमेरिकेच्या वारवरा लेपचेंकोला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ ने हरवले.
लिएंडर पेस-रोहन बोपन्ना समोरासमोर
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनी आपापल्या जोडीदारांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता दोन्ही भारतीय खेळाडू सेमीफायनलमध्ये आमने-सामने असतील. मिश्र दुहेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पेस-मार्टिना हिंगीस जोडीला होरिया टिकाऊ-सिमोना हालेप जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. दुसर्या क्वार्टर फायनलमध्ये बोपन्ना आणि चानने चीन-तैपेईची जोडी सू वी सीह आणि फिनलँडचा हेन्री कोंटिनेन यांना एक तास आणि १९ मिनिटांत तीन सेटमध्ये ७-६, ५-७, १३-११ ने हरवले आहे.
माझी कामगिरी साधारण
मी मागच्या सामन्यात जसा खेळ केला, तसा आक्रमक खेळ या वेळी करू शकलो नाही. या टेनिस कोर्टवर खूप वेग बघायला मिळाला. जो खेळाडू उत्तम आहे, अशा खेळाडूविरुद्ध खेळताना आक्रमक व्हावे लागते. मी या वेळी आक्रमक नव्हतो. माझी कामगिरी साधारण ठरली. माझा खेळ चांगला व्हायला हवा होता. - अँडी मरे, पराभवानंतर.