आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argentina Defeated Chile In Copa America Football

कोपा अमेरिका फुटबाॅलमध्‍ये अर्जेंटिनाला 'चिली'चा तडका !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेसीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर कोपा अमेरिका फुटबॉलच्या ट्रॉफीसह चिलीच्या खेळाडूंनी असा जल्लोष केला. ही थरारक लढत चिलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकली. - Divya Marathi
मेसीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर कोपा अमेरिका फुटबॉलच्या ट्रॉफीसह चिलीच्या खेळाडूंनी असा जल्लोष केला. ही थरारक लढत चिलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकली.
सँटियागो - सुपरस्टार लियोनेल मेसीच्या नेतृत्वातील बलाढ्य अर्जेंटिनाचे कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ गोलने गर्वहरण करून चिलीने प्रथमच विजेतेपदाचा मान मिळवला. अर्सेनलचा स्टार अलेक्सी सांचेझने चिलीसाठी विजयी स्पाॅटकिक हाणली. परिणामी यजमान चिलीने सामन्याच्या नियमित ९० व अतिरिक्त ३० अशा एकूण १२० मिनिटांत गोलशून्य स्थितीत बरोबरीत संपलेल्या या निर्णायक लढतीत शूटआऊटमध्ये बाजी मारली.

सांचेझने अगदी हलकी चिपकिक हाणून चेंडू गोलजाळ्यात टाकल्यानंतर एस्टॅडिओ नॅशनल स्टेडियमवरील ४५ हजार प्रेक्षकांना आकाश ठेंगणे झाले. गोलरक्षक क्लाउडिओ ब्राव्होने आधी बनेगाची स्पाॅटकिक झेप घेत रोखली. त्यानंतर गोझालो हिगुएनने बारवरून चेंडू हाणला. यानंतर सावरत चिलीने शूटआऊटवर नियंत्रण मिळवले. तिकडे २२ वर्षांनंतर अर्जेंटिनाला आंतरराष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न बघणारा कर्णधार मेसी या सामन्यात संघासाठी फार काही करू शकला नाही. त्यामुळे चिली संघ व प्रेक्षक जल्लोष करीत असताना त्यांच्यावर केवळ हवालदिलपणे बघत बसण्याची वेळ आली. आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले, अशी भावना चिलीचा स्टार आर्टुरो विडालने व्यक्त केली.

९९ वर्षांनंतर चिलीला यश
कोपा अमेरिका चषक फुटबाॅल स्पर्धेच्या सुमारे ९९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच चिलीला अमेरिका खंडातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात यश आले. बरे,विशेष बाब अशी की, कोपा अमेरिका चषकात हा चिलीचा अर्जेंटिनाविरुद्ध पहिलाच विजय होय विश्वचषकातील अपयशानंतर मिळालेल्या या यशाची चवच काही और असल्याचे मत सांचेझने व्यक्त केले.

अर्जेंटिनाला एकाच वर्षात दोन धक्के
अर्जेंटिनाकडे मेसीसारखा स्टार खेळाडू असूनही त्यांना गेल्या २२ वर्षांत एकही मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकता आली नाही. ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीने मेसीच्या संघाला नमवले होते. त्यानंतर कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम सामन्यात तर चिलीने अर्जेंटिनाला मोठा धक्का दिला.

फुटबाॅलप्रेमींच्या उत्साहाला उधाण : चिलीने प्रथमच कोपा अमेरिका चषक पटकावल्यानंतर सँटियागोसह संपूर्ण चिली देशातील फुटबाॅलप्रेमींच्या उत्साहाला नुसते उधाण आले.

मेसीच्या कुटुंबाला धक्काबुक्की
चिलीच्या चाहत्यांनी पहिल्या हाफ टाइमच्या थोड्या वेळ आधी मेसीच्या कुटुंबासमवेत धक्काबुक्की केली. शिवाय त्याचा भाऊ रोड्रिगोला मारहाणही केली. यानंतर मेसीच्या कुटुंबाला टेलिव्हिजन केबिनमध्ये पोहोचवण्यात आले. शिवाय लढतीदरम्यान सामान्य प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेले अर्जेंटिनाचे खेळाडू सर्जियो एगुरिओच्या कुटुंबालाही चिलीच्या चाहत्यांनी मारहाण केली. दोन्ही फुटबॉलपटूंच्या कुटुंबाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

मेसी-मॅरेडोना यांची तुलना चर्चेत
पुन्हा एकदा हादरवणारा पराभव पदरी आल्यामुळे मेसी व दिएगो मॅरेडोना यापैकी श्रेष्ठ कोण, अशी अनावश्यक तुलना फुटबाॅल जगतात सुरू झाली आहे. कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम लढतीत चिलीकडून कटू पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मेसीच्या नशिबी पराभवच असल्याची भावना फुटबाॅलप्रेमींच्या मनात घर करीत चालली आहे. गेल्या १२ महिन्यांत अर्जेंटिना संघाला सहन करावे लागलेले हे दुसरे मोठे अपयश होय. जर्मनीने विश्वचषकात अनपेक्षितपणे मेसीच्या संघाचा धुव्वा उडवला होता. माझा तगडा व नव्या दमाचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असे कोपा अमेरिका चषक सुरू होण्यापूर्वी मेसी म्हणाला होता.विश्वचषकात थोडक्यात जेतेपद हुकले तरी येथे संघभावनेने खेळणार असल्यामुळे कोणतीही स्पर्धा जिंकण्याची आमच्यात क्षमता आहे, अशी मखलाशीही त्याने केली होती.

दोघांत श्रेष्ठ कोण?
गोल नोंदवण्याचा विचार केला तर मेसी मॅरेेडोनापेक्षा निश्चितपणे सरस आहे. १०३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ४६ गोल केले असून ९१ लढतीत मॅरेडोनाने ३४ गोल ठोकले आहेत. क्लब स्तरावरही मेसीने ४८२ सामन्यांमध्ये ४१२ आणि मॅरेडोनाने ५८८ लढतीत ३१२ वेळा चेंडू जाळ्यात टाकला. मेसीने बार्सिलोनाला तीनदा युरोपियन चषक जिंकून दिला. त्याचप्रमाणे सुपरस्टारला चार वेळा विश्वातील सर्वोत्तम फुटबाॅलपटू पुरस्कार मिळाला तर मॅरेडोनाला केवळ एकदा. मात्र मॅरेडोनाप्रमाणे (मेक्सिको १९८६) मेसीला विश्वविजेतेपद मिळवून देता आले नाही.