आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Shooting Championships Sumedha Kumar Gold Medal

आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुमेधकुमारचा ‘सुवर्ण’वेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- औरंगाबादचा गुणवंत नेमबाज सुमेधकुमार देवने आठव्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी ‘सुवर्ण’वेध घेतला. त्याने ज्युनियर गटातील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हे सोनेरी यश संपादन केले. सुमेधने फायनलमध्ये १९९.१ गुणांची कमाई करून सुवर्णपदकावर नाव कोरले. याशिवाय त्याने भारतीय संघाला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. यापूर्वी बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. यासह भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावरील पदकांची लूट कायम ठेवता आली. भारताचे स्पर्धेतील हे तिसरे सुवर्णपदक ठरले.

याच गटात भारताचा युवा नेमबाज हेमेंद्र कुशवाहने रौप्यपदक पटकावले. त्याने फायनलमध्ये १९५.२ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. यासह या गटातील दोन्ही पदकांवर भारताच्या नेमबाजांना आपला दबदबा कायम ठेवता आला. त्यानंतर याच गटात बांगलादेशचा मोहंमद अहमद कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

या गटात भारताच्या आचल प्रताप ग्रेवालला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने १५४.० गुणांसह हे स्थान गाठले.

१० मीटर एअर पिस्तूल
१९९.१ गुणांसह सुमेध अव्वल
१९५.२ गुणांसह हेमेंद्रला रौप्यपदक
गुरप्रीत, जितू रॉय चमकले
भारताचे स्टार नेमबाज गुरप्रीत सिंग आणि जितू रॉयने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदकाची कमाई केली. या गटात गुरप्रीतने रौप्यपदक पटकावले. त्याने १९७.६ गुणांची कमाई करताना या गटात दुसरे स्थान गाठले. त्यापाठोपाठ जितू रॉय कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने १७७.६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली. इराणचा सेपेहारने सुवर्णपदक पटकावले.
पालकांमुळे यश
माझ्या आईवडिलांनी मला नेहमी खेळासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. वडिलांचे पाठबळ मला नेहमी पुढे जाण्यासाठी मदतगार ठरले. माझ्या प्रशिक्षकांचे योगदानही मी विसरू शकणार नाही. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित आहे.
- सुमेधकुमार देव, नेमबाज.