आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूच्या खेळपट्टीकडे आता लक्ष; दोन्ही संघांचा कसून सराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ४ मार्च शनिवारपासूून येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. या स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताने या मैदानावर १९७४ पासून ते आतापर्यंत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारताने सहामध्ये विजय मिळवला असून, सहा सामने भारताने गमावले आहेत. येथे ९ कसोटी सामने ड्रॉ झाले. या मैदानावर भारताने अखेरची कसोटी नोव्हेंबर २०१५ मध्ये खेळली होती. भारत-द. आफ्रिकेतील ही कसोटी येथे ड्रॉ झाली होती.  
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या मैदानावर पहिली कसोटी सप्टेंबर १९७९ मध्ये झाली. तो सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर येथे दोन्ही संघ १९९८ मध्ये समोरासमोर आले. यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेटने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने याच मैदानावर भारताला २००४ मध्ये २१७ धावांनी हरवले होते. मात्र, भारताने २०१० मध्ये येथे ऑस्ट्रेलियाला ७ विकेटने हरवून पराभवाचा हिशेब चुकता केला होता.  
 
भारताचे ६ विजय
या मैदानावर भारताने इंग्लंडला फेब्रुवारी १९७७ मध्ये १४० धावांनी, न्यूझीलंडला नोव्हेंबर १९८८ मध्ये १७२ धावांनी, श्रीलंकेला जानेवारी १९९४ मध्ये एक डाव आणि ९५ धावांनी, न्यूझीलंडला ऑक्टोबर १९९५ मध्ये ८ विकेटने आणि न्यूझीलंडला पुन्हा २०१२ मध्ये ५ विकेटने हरवले होते. ऑस्ट्रेलियाला २०१० मध्ये ७ विकेटने हरवले.  

१९ सामन्यांत सलग अपराजित राहण्याचा क्रम एक दिवस मोडणारच होता. हे क्रम कायम ठेवणे अशक्य काम आहे. प्रत्येक सामन्यात विजय मिळवणे कठीण काम आहे. कधी ना कधी हा क्रम मोडेलच. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आताची परिस्थिती पाहता सलग १९ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम ही मोठी कामगिरी आहे - अनिल कुंबळे, कोच टीम इंडिया.

पुनरागमनाचे प्रयत्न : रोिहत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करण्याचे माझे प्रयत्न आहे, असे फलंदाज रोहित शर्माने सांगितले. रोहित शर्मा आता विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार आहे. 

मागच्या १० कसोटींत २३ झेल सोडले
मागच्या १० कसोटी सामन्यांत टीम इंडियाने २३ झेल सोडण्याची सुमार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिल्या पुणे कसोटीत भारताने ५ झेल सोडले होते. सुमार क्षेत्ररक्षण हे भारताच्या पराभवाचे एक कारण ठरले. आता भारताला मालिकेत कमबॅक करायचे असेल तर टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी करून झेल पकडावे लागतील.
 
बंगळुरूत टीम इंडियाने फलंदाजाच्या जवळचे झेल घेण्याचा कसून सराव केला. चेतेश्वर पुजाराने छोट्या बॅटने खेळाडूंना स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव दिला. यानंतर स्वत:सुद्धा फिल्डिंग पोझिशन घेऊन त्याने सराव केला. या वेळी सराव क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी करवून घेतला. अजिंक्य रहाणेनेसुद्धा झेल घेण्याचा कसून सराव केला. पुण्यात झेल सोडणाऱ्या मुरली विजयनेसुद्धा बंगळुरूत कसून सराव केला.  
बातम्या आणखी आहेत...