आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन: सायना दुसऱ्या फेरीत; सिंधूचा मात्र पहिल्याच फेरीत पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - भारताची नंबर वन महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने शानदार प्रदर्शन करताना ७,५०,००० अमेरिकन डाॅलर बक्षीस रक्कम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, भारताची दुसरी महिला खेळाडू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनीसुद्धा चांगला खेळ करताना दुसऱ्या फेरीत आपले स्थान पक्के केले. पुरुष एकेरीत भारताचा आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तला मात्र पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारचा दिवस भारतीयांसाठी संमिश्र यश देणारा ठरला.
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाने पहिल्या फेरीत आपल्या लौकिकानुसार खेळ केला. सायनाने आक्रमक खेळ करून यजमान ऑस्ट्रेलियाच्या जॉय लाईला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. सायनाने अवघ्या २९ मिनिटांत २१-१०, २१-१४ ने सामना जिंकला. सायनाने दोन्ही गेममध्ये आक्रमक सुरुवात करून अखेरपर्यंत तोच दबदबा कायम ठेवला. तिने विरोधी खेळाडूला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. जॉय लाईने दुसऱ्या गेममध्ये थोडा संघर्ष केला. मात्र, तिला सायनाचे आव्हान मोडता आले नाही. सातवी मानांकित सायनाला आता दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या जिन वेई गोहशी लढायचे आहे.

पुरुष दुहेरीत िनराशा
पुरुष दुहेरीत भारतीय जोडी निखर गर्ग आणि एम. अनिलकुमार राजू यांनी निराशा केली. या दोघांना मलेशियाची जोडी व्ही. शेम गोह आणि वेई किंओंग तान यांनी १२-२१, १०-२१ ने अवघ्या १६ मिनिटांत पराभूत केले. भारतीय खेळाडू आव्हान देऊ शकले नाहीत.

युवा तन्वी विजयी
भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी लाडने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. तन्वीने सामन्यात मागे पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना १८-२१, २१-१४, २१-११ ने विजय मिळवला. तन्वीने क्वालिफायरची खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टिफनी हो हिला ५२ मिनिटांत हरवले. तन्वीने या विजयासह दुसरी फेरी गाठली. आता तिचा सामना चौथी मानांकित वांग यिहानशी आहे.

किदाम्बी श्रीकांत, समीर दुसऱ्या फेरीत
१२ वा मानांकित भारताचा किदाम्बी श्रीकांतने दुसरी फेरी गाठली. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या ना का लाँग अँगसला ३२ मिनिटांत हरवले. श्रीकांतचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या सोनी देई कुनकोरो याच्याशी होईल. भारताच्या समीरनेसुद्धा विजयी कामगिरी केली. समीरने इंडोनेशियाच्या इसन मौलाना मुस्तफाला २२-२०, १५-२१, २१-१५ ने मात दिली. सोमवारी क्वालिफाइंग सामन्यांत चांगले प्रदर्शन करणाऱ्या भारताच्या गुरुसाईदत्तला बुधवारी पराभवाचा सामना करावा लागला. त्याला हाँगकाँगच्या हू यूनने १९-२१, २१-१२, १५-२१ ने तीन गेममध्ये हरवले.

पी.व्ही. सिंधूचा अनपेक्षित पराभव
जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूला तिच्यापेक्षा कमी मानांकनाच्या कोरियन खेळाडूने हरवले. ४० व्या मानांकित द. कोरियाच्या किम हयो मिनने सिंधूला ५५ मिनिटांत स्पर्धेबाहेर केले. तिने १८-२१, १९-२१ असा सामना जिंकला. सिंधूने दुसऱ्या गेममध्ये चांगला संघर्ष केला होता.
बातम्या आणखी आहेत...