आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : पहिल्याच फेरीत नदाल बाहेर; वर्दास्कोचा दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी धक्कादायक निकाल लागले. माजी चॅम्पियन स्पेनचा स्टार राफेल नदालचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. महिला गटात दुसरी मानांकित सिमोना हालेप आणि आठवी मानांकित अमेरिकेची व्हीनस विल्यम्स यांनाही पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, इतर मानांकित खेळाडूंनी आपला फॉर्म कायम ठेवून आगेकूच केली.
व्हिक्टोरिया अझारेंका, अँडी मरे, अँजोलिक कर्बर आणि डेव्हिड फेरर यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १४ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता नदालला स्पेनच्याच फर्नांडो वर्दास्कोने ७-६ ४-६, ३-६, ७-६, ६-२ ने मात दिली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्या फेरीत नदाल बाहेर होण्याची ही दुसरी वेळ आहे. महिला गटात हालेपला चीनची क्वालिफायर खेळाडू झांग शुअाईने बाहेरचा रस्ता दाखवला. जगातली १३३ व्या क्रमांकाची खेळाडू शुआईने हालेपला सरळ सेटमध्ये ६-४, ६-३ ने हरवले. शुआई झांगने ग्रँडस्लॅममध्ये आपल्या १५ व्या प्रयत्नानंतर मुख्य ड्रॉमध्ये िवजय मिळवला. तिने ७८ मिनिटांत हालेपला हरवले. माजी नंबर वन व्हीनसला इंग्लंडच्या जोहाना कोंटाने सरळ सेटमध्ये ६-४, ६-२ ने हरवले.
अझारेंका, यांकोविकचा सहज विजय : बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका आणि सर्बियाच्या येलेना यांकोविक यांनी आपापले सामने सहजपणे जिंकले. १४ वी मानांकित अझारेंकाने बिगर मानांकित एलिसन वानला ६-०, ६-० ने तर यांकोविकने स्लोव्हाकियाच्या पोलोना हरकोगला ६-३, ६-३ ने हरवले. महिला एकेरीच्या इतर सामन्यात अमेरिकेच्या मेडिसन किजने कझाकिस्तानच्या जरिना डियासला ७-६, ६-१ ने, तिसरी मानांकित स्पेनच्या गरबाईन मुगुरजाने अॅस्टोनिया एनेट कोंटावेटला ६-०, ६-४ ने तर सर्बियाच्या अॅना इवानोविचने ऑस्ट्रियाच्या तामी पॅटरसनला ६-२, ६-३ ने मात दिली. सातवी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बरने जपानच्या मिसाकी दोईला ६-७, ७-६, ६-३ ने हरवले.
मरे, फेरर जिंकले : दुसरा मानांकित इंग्लंडच्या अँडी मरेने जर्मनीच्या अॅलेकसांद्र जेवेरेवला ६-१, ६-२, ६-३ ने तर आठवा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने जर्मनीच्या पीटर गोजोविकला ६-४, ६-४, ६-२ ने तर २३ वा मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सने जपानच्या युईची सुगिताला ६-१, ६-३, ६-२ ने तर ऑस्ट्रेलियाच्या सॅम्युअल ग्रोथने फ्रान्सच्या आंद्रियन मिनारियोला ७-६, ६-४, ३-६, ६-३ ने हरवले.
महिला प्रेक्षकामुळे सामना थांबला
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बर्नार्ड टॉमिक आणि उज्बेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन यांचा पहिल्या फेरीचा सामना एका महिला प्रेक्षकामुळे थोडा वेळ थांबवावा लागला. इस्तोमिन टॉमिकविरुद्ध सर्व्हिस करणार होता, तेवढ्यात एक महिला प्रेक्षक सामना थांबवा, असे जोराने ओरडली. टॉमिकला काहीच कळले नाही, आणि त्याने खेळ थांबवण्यास सांगितले. ती महिला खेळाडू अॅलर्जीमुळे वेदनेने ओरडत होती. डॉक्टरांना लगेच बोलावण्यात आले आणि तिला इंजेक्शन दिले. नंतर त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता बरी आहे. या गोधंळामुळे जवळपास २० मिनिटे खेळ थांबला होता.
नदाल-वर्दास्को सामना
रॉड लेवर एरेनात नदाल-वर्दास्को या स्पेनच्या खेळाडूंत चांगली झुंज रंगली. हा सामना पाच सेटपर्यंत चालला. फायनल सेटमध्ये ०-२ ने मागे पडल्यानंतरही वर्दास्कोने जबरदस्त फोरहँड मारून दोन वेळा नदालची सर्व्हिस मोडून ५-२ ने आघाडी घेतली. यानंतर वर्दास्कोने तिसऱ्यांदा नदालची सर्व्हिस मोडली आणि क्रॉस कोर्ट शॉटसह सेट आणि सामना जिंकला.
शानदार सामना
मी प्रत्येक शॉट मारला. पाचवा सेट तर अविश्वसनीय होता. मी विनर्स मारले. मी डोळे बंद केले आणि सर्व काही होत गेले. हा शानदार सामना ठरला आहे.
- वर्दास्को, नदालला हरवल्यानंतर.