आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 25 टक्के पगारवाढ घेण्यास बांगर, श्रीधर यांचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेटचा कारभार, तोंडी आश्वासनांवर आणि गावखात्यात कसा चालायचा याचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी २५ टक्के पगारवाढ घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदच्युत केलेले सचिव अजय शिर्के यांनी त्यांना तसे वचन दिले होते. अशा दिलेल्या शब्दांचा भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनाही याआधी फटका बसला होता.
 
आयपीएल आधी सुरू झालेल्या आयसीएल लीगचे महत्त्व कमी करण्यासाठी सुनील गावसकर यांची छबी वापरण्यात आली होती. समोरच्या लीगमध्ये कपिलदेवसारखा दिग्गज असल्यामुळे त्या वेळी आयपीएलचे संचालक ललित मोदी आणि त्या वेळचे बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावसकर यांना आयपीएलचा करार करण्याची गळ घातली होती. बदल्यात गावसकर यांना वर्षाकाठी सुमारे ४ कोटींच्या जवळपास रक्कम देण्यात येणार होती. पदाधिकारी बदलले आणि गावसकरांना ती रक्कम कधीच मिळाली नाही. शरद पवार यांनीही त्या वेळी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना ती गोष्ट मान्य केली होती. आम्ही दिलेले वचन नंतरच्या पदाधिकाऱ्यांनी पाळले नाही, असे पवारांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. लेखी स्वरूपात काहीही नसल्याने गावसकरांचे त्या वेळी मोठे नुकसान झाले होते. चार वर्षांचे मानधन गावसकरांना ठरल्यानुसार मिळाले नव्हते.  

अनिल कुंबळे यांना सध्या प्रशिक्षक म्हणून वर्षाकाठी साडेसहा कोटी रुपये मानधन मिळते. बांगर व श्रीधर यांचे मानधन मात्र गेली तीन वर्षे आहे तेवढेच आहे. मात्र, लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अशी अनेक प्रकरणे घडली. लेखी स्वरूपात जेथे काहीही नव्हते, ती वचने पाळली गेली नाहीत.   

करारपत्रात नेमके काय आहे ?
सपोर्ट स्टाफच्या करारपत्रात नेमके काय आहे, याबाबतही बीसीसीआयला यापुढे निर्णय घ्यावा लागणार आहे. बांगर व श्रीधर यांनी २५ टक्के वाढ घेण्यास नकार दिल्यामुळे बीसीसीआयची व प्रशासक मंडळाची यापुढील कृती कोणती असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...