आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग : बंगाल वॉरियर्सकडून दिल्लीचे पानिपत!, २०-१७ ने विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - बंगाल वॉरियर्सने शनिवारी दुसऱ्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगमध्ये शानदार विजयाची नोंद केली. बंगालने घरच्या मैदानावर यजमान दिल्लीचे पानिपत केले. बंगालच्या वॉरियर्सने २०-१७ अशा फरकाने रंगतदार सामना जिंकला. यासह बंगालच्या टीमने गुणतालिकेत सातवे स्थान गाठले. या टीमचे दोन विजयासह एकूण १६ गुण झाले आहेत. दुसरीकडे दंबग दिल्लीला लीगमध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. पराभवासह दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

जांग कुन लीच्या नेतृत्वाखाली बंगाल वॉरियर्सने शानदार विजय संपादन केला. या वेळी सचिन खांबे (५) आणि महेंद्र राजपूत (३) यांनी उल्लेखनीय कामगिरीसह संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच विजिन, विनीत शर्मा आणि नीलेश शिंदे यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी दोन गुणांचे योगदान दिले. त्यामुळे बंगालला यजमान दिल्लीला धूळ चारता आली.

विजिन आणि विनीतने उत्कृष्ट चढाया करून बंगालला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर सचिनने यजमान टीमच्या खेळाडूंची दमछाक करून सलग गुणांची कमाई केली. यासह त्याने संघाची सामन्यातील आघाडी मजबूत केली.

रवींद्रची एकाकी झुंज व्यर्थ
यजमान दबंग दिल्लीला आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार रवींद्र पहलने एकाकी झुंज दिली. त्याने संघाकडून सर्वाधिक ५ गुणांची कमाई केली. मात्र, त्याने दिलेली झुंज व्यर्थ ठरली. याशिवाय काशिलिंग अडके (३), राकेश (२) आणि दादासो (२) यांनाही समाधानकारक खेळी करता आली नाही.

दिल्लीसमोर आज पाटणा
यजमान दिल्लीला आपल्या घरच्या मैदानावर पराभवाची मालिका खंडित करण्याचे मोठे आव्हान आहे. रविवारी यजमान दिल्लीचा सामना पाटणा पायरेट्सशी होईल. गत सामन्यातील पराभवातून सावरत दिल्लीचा संघ मोठ्या फरकाने विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. मात्र, दुसरीकडे पाटणा पायरेट्स संघाने पाचव्या विजयासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

पाटणा टीमचा चौकार
संदीप नारवालच्या नेतृत्वाखाली पाटणा पायरेट्सने शनिवारी लीगमध्ये विजयी चौकार मारला. या टीमने सामन्यात बंगळुरू बुल्सचा पराभव केला. पाटणा संघाने ३०-२८ अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह पाटणा टीमने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली. बंगळुरू बुल्सचा तिसरा पराभव ठरला. मात्र, तरीही बंगळुरूने आपले तिसरे स्थान कायम ठेवले.