आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र जिंकावा म्हणून रेसमध्ये स्वत:हून हरली मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंकनशायर (इंग्लंड) - शाळेतील मित्र एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होतात. सोबतच्या मित्राचा अभ्यास असो किंवा त्याच्यासोबत मैदानावर खेळायचे असो. येथील सेंट मेरी कोएड प्रायमरी स्कूलच्या आठव्या वर्गातील मुलांनीसुद्धा असेच केले. या वर्गातील एका मित्राला रेसमध्ये विजय मिळवून देण्यासाठी इतर मुले जाणूनबुजून मागे राहिली. आपल्या एका मित्राला आनंद मिळावा यासाठी त्यांनी असे केले.

११ वर्षीय रॉरी केटलेस डाऊन सिंड्रोमने पीडित आहे. यात मुलांचा शारीरिक विकास थांबतो आणि आयक्यूसुद्धा कमी होतो. राॅरी आठव्या वर्गात शिकतो. त्याच्या शाळेत सध्या क्रीडा सप्ताह सुरू आहे. हे त्याचे शाळेतील शेवटचे वर्ष आहे. यानंतर तो आपल्या मित्रांपासून वेगळा होईल. सर्व मुले वेगवेगळ्या शाळेत जातील. यामुळे क्रीडा सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सर्व मित्रांनी काही वेगळे करण्याचे ठरवले. रॉरीला विजय मिळवून देण्याची सर्वांची इच्छा होती. यामुळे रेस सुरू झाली तेव्हा थोडे धावल्यानंतर त्याच्या मित्रांनी आपला वेग कमी केला आणि एकमेकांच्या गळ्यात हात टाकून पळू लागले.

रॉरीने अव्वल क्रमांक मिळवावा, यासाठी हे सुरू होते. इतर मुले गळ्यात हात टाकून एकत्र धावल्याने ते सर्व दुसऱ्या क्रमांकावर आले. असेच घडलेही. रॉरी मित्रांच्या पुढे निघाला आणि रेस जिंकली. मात्र, त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर कसलाही राग, निराशा नव्हती. ते सर्व मित्र खुश होऊन आनंदात रॉरीच्या गळ्यात जाऊन पडले.

मुलांच्या पालकांनी म्हटले, "आम्हाला आमच्या पाल्यावर अभिमान आहे. हा निर्णय त्यांचा सर्वांचा होता. शिक्षकानेसुद्धा कोणावरही दबाव टाकला नाही. आपल्या अखेरच्या स्पोर्ट््स डेला त्यांना संस्मरणीय बनवायचे होते.' शाळेच्या मुख्याध्यापिका मेरिक्लेयर पॉटरटन म्हणाल्या, "रेस संपल्यानंतर आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. या मुलांनी एक नवे उदाहरण दिले आहे. हे सर्व अविश्वसनीय आहे. मी आमच्या मुलांमुळे खूप प्रभावित झालो आहे.'

एकीकडे सर्वजण या मुलांची स्तुती करीत होते, तेव्हा त्यांना मात्र ही गोष्ट फार मोठी वाटली नाही. मुले म्हणाली, "ही घटना खूप सामान्य आहे. आम्ही मित्र एकमेकांसाठी असे करीत असतो.'
बातम्या आणखी आहेत...