अपिया - युवा खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने पाचव्या राष्ट्रकुल यूथ गेम्समध्ये साेमवारी पहिला दिवस गाजवला. भारताने स्पर्धेच्या तीन वेगवेगळ्या खेळ प्रकारांत पदकाची कमाई केली. यामध्ये दाेन सुवर्णांसह एका रौप्यपदकाचा समावेश आहे. यासह भारताच्या संघाने पाचव्या स्थानावर धडक मारली.या स्पर्धेत भारताचे एकूण २५ खेळाडू सहभागी झाले. मात्र, यातील आठ खेळाडूंना शिस्तभंगाच्या कारवाईमुळे स्पर्धेतून बाहेेर पडावे लागले. देरूने साेनेरी यश संपादन करून भारताचा स्पर्धेत दबदबा निर्माण केला.
दिल्लीचा युवा खेळाडू तेजस्विन शंकर आणि जमजंग देरूने पहिल्याच दिवशी भारतीय संघाकडून पदकाचे खाते उघडले. या दाेघांनी
आपापल्या खेळ प्रकारात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. तसेच सुप्रिया माेडालने जलतरणामध्ये राैप्यपदक पटकावले. भारताचा युवा खेळाडू जमजंग देरूने ५६ किलाे वजन गटात साेनेरी यश संपादन केले. त्याने सुवर्णपदकावर नाव काेरले. भारताच्या १७ वर्षीय देरूने एकूण २३७ किलाे वजन उचलले. यात स्नॅचमध्ये १०२ आणि क्लीन-जर्कमध्ये १३५ किलाेचा समावेश आहे. यासह ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने अव्वल खेळाडूंपेक्षश सरस कामगिरी करून या गटात आपला दबदबा निर्माण केला.
जलतरणात सुप्रिया चमकला
स्पर्धेतील जलतरणामध्ये भारताचा सुप्रिया माेडाल चमकला. त्याने २०० मीटर बटरफ्लाॅय प्रकारात राैप्यपदक जिंकले. त्याने २ मि. १.९४ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण करून दुसरे स्थान गाठले. या गटात न्यूझीलंडचा विलरिच काेईटझी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
उंच उडीत शंकरचा नवा विक्रम
भारताचा युवा खेळाडू तेजस्विन शंकर पहिल्याच दिवशी चमकला. या १७ वर्षीय खेळाडूने उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने २.१४ मीटर उंच उडी मारून पदक आपल्या नावे केले. याशिवाय त्याने आपल्या नावे नव्या विक्रमाची नाेंद केली. त्याने आपल्याच देशाच्या हरिशंकर राॅयचा २.१३ मीटरचा विक्रम माेडीत काढला. गत महिन्यात हैदराबाद येथील स्पर्धेदरम्यान हरिशंकरचा अपघाती मृत्यू झाला.