आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अजित घुलेंची मॅरेथॉनमध्ये यशस्वी धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देशातील प्रतिष्ठित अशा बंगळुरू अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये औरंगाबादचे डॉ. अजित घुले यांनी मराठी झेंडा फडकावला. त्यांनी ५० किमी मॅरेथॉन अवघ्या ७ तास २० मिनिटांत पूर्ण करून शानदार कामगिरी केली.

विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेले ते मराठवाड्यातील एकमेव धावपटू होते. आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून नित्य सराव करत त्यांनी हे यश मिळवले.

या स्पर्धेच्या तीन दिवस पूर्वी येथे पाऊस झालेला असल्याने येथील वातावरण अल्हाददायक व चांगले होते. सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला हिनूर बांबू फॉरेस्ट या जंगलातून सुरुवात झाली. निसर्गरम्य व स्वच्छ वातावरणात धावताना कोणतीही अडचण आली नाही. धावण्याच्या मार्गावर आयोजकांनी पिण्याचे पाणी, आहार, फळे, ओआरएस आदी गोष्टींची चांगली व्यवस्था केली होती. ५० किमी धावणे हे मोठे आव्हान असते. या ठिकाणी तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. तुमची मानसिक तयारी आणि फिटनेस असेल तर तुम्ही सहज यश मिळवू शकतात, असे घुले यांनी म्हटले. गेल्या चार वर्षांत डॉ. घुले यांनी आतापर्यंत विविध १४ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन मॅरेथॉन पूर्ण केली आहे. त्यांना डॉ. विवेक घारपुरे, डॉ. जयश्री घुले, एबीबी ग्रुप, टायटन्स फुटबॉल क्लब यांचे सहकार्य लाभत आहे. आता ते येत्या १३ डिसेंबरला ४२ किमीच्या गोवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

आहारावर विशेष लक्ष
मॅरेथॉनच्या तयारीदरम्यान योग्य प्रमाणात झोप, प्रथिनेयुक्त अन्न आणि मॅरेथॉनच्या तीन दिवस पूर्वी कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात सेवन करावे लागते. मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी, नारळ पाणी प्यावे लागते, असे घुले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घुले दररोज २ तास धावण्याचा सराव करतात सोबत व्यायामाची जोड असते. आजच्या तरुणांनी व्यसनापासून दूर राहायला हवे. निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी नियमित धावले पाहिजे किंवा एखादा खेळ खेळला पाहिजे. तरच तुमचे हृदय चांगले राहते. तुमच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल, असे घुले म्हणाले. ते लडाख येथील कठीण मॅरेथॉनमध्येदेखील धावले आहेत.
बातम्या आणखी आहेत...