आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • En Remportant La Hong Kong Premier League Chan Yuen Ting Est Entree Dans L Histoire

प्रोफेशनल फुटबॉल न खेळता पुरुष टीमची कोच, ईस्टर्न एफसीने जिंकली हाँगकाँग प्रीमियर लीग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग- ईस्टर्न फुटबॉल क्लबने हाँगकाँग प्रीमियर लीग फुटबॉल २०१६ चे विजेतेपद जिंकले. या विजयाने कोच चान युएन तिंगचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले. तिंग कोणत्याही देशात क्लब पातळीवरील अव्वल फुटबॉल स्पर्धेत पुरुष संघाला चॅम्पियन बनवणारी पहिली महिला कोच बनली आहे. २७ वर्षीय तिंगचे वय तिच्या संघातील अनेक खेळाडूंपेक्षा कमी आहे. मागच्या डिसेंबरमध्ये तिला कोच बनवण्यात आले तेव्हा या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ज्या महिलेने कधीही प्रोफेशनल फुटबॉल खेळला नाही, ती संघाला कसे काय प्रशिक्षण देईल, असेही अनेकांनी विचारले. मात्र, चार महिन्यांत तिंगने सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. तिच्या मार्गदर्शनात ईस्टर्नच्या संघाने २१ वर्षांत पहिल्यांदा किताब जिंकला आहे. चॅम्पियन बनण्याच्या प्रवासात ईस्टर्नला १५ सामन्यांत केवळ एका पराभवाचा सामना करावा लागला.
डेव्हिड बेकहॅमच्या फॅनपासून ते चॅम्पियन टीमच्या कोचपर्यंतचा तिंगचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या कारकीर्दीत असेही वळण आले, जेव्हा तिने फुटबॉल सोडण्याचे ठरवले होते. जिओग्राफीची विद्यार्थिनी असलेल्या तिंगला फुटबॉलमधील पहिले काम पेगासस एफसी संघात डाटा अॅनालिस्टच्या रूपात मिळाले. मात्र, काही दिवसांत प्रायोजकांनी क्लब सोडले आणि तिंगची नोकरी गेली. तेव्हा तिने फुटबॉल सोडण्याचे ठरवले होते. "मी त्या वेळी शिक्षक, पोलिस..काहीही बनण्यास तयार होते. मात्र, मित्रांनी समज काढल्यानंतर मी फुटबॉलमध्येच आणखी संघर्ष करण्याचे ठरवले,' असेही या वेळी तिंग म्हणाली.
ईस्टर्न टीमची मुख्य कोच बनल्यानंतही तिला सुरुवातीला संघर्षाचा सामना करावा लागला. प्रीमियर लीगमध्ये तर तिची टीम चांगली कामगिरी करीत असे, मात्र इतर स्पर्धांच्या काही प्रमुख सामन्यांत त्यांचा पराभव झाला. तेव्हा तिंगने स्वत:वर शंका घेण्यास सुरुवात केली. हे काम आपल्या लायकीचे नाही, असे तिला वाटू लागले. मात्र, खेळाडू आणि इतर कोचिंग स्टाफच्या मदतीमुळे तिने संकटावर मात केली. आता युरोपच्या मोठ्या संघांना प्रशिक्षण देण्याचे तिंगचे स्वप्न आहे.