आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो चषक फुटबॉल : वेल्स प्री-क्वार्टरमध्ये!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तौलोस (फ्रान्स) - गॅरेथ बेलने स्पर्धेत केलेल्या तिसऱ्या गोलच्या बळावर युरो चषक फुटबॉल स्पर्धेत वेल्सने ब गटातील सामन्यात रशियाला ३-० ने हरवले. या विजयासह वेल्सने स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर वेल्सच्या नावे ६ गुण झाले असून गटात ही टीम टॉपवर पोहोचली आहे. वेल्सने साखळीत तीनपैकी २ सामने जिंकले.

वेल्सने सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या हाफमध्ये अॅरोन रॅमसी आणि नील टेलर यांनी आपल्या टीमसाठी गोल केले. या दोघांच्या पराक्रमामुळे रशियाचे सामन्यातील पुनरागमन कठीण झाले. रॅमसीने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला गोल करून वेल्सला १-० ने आघाडी मिळवून दिली. याच्या २० मिनिटांनंतर टेलरने दुसरा गोल करून वेल्सचा स्कोअर २-० असा केला. रशियन संघाला पहिल्या हाफमध्ये एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये रशियाने गोल करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक गोल करणाऱ्या वेल्सच्या गॅरेथ बेलने सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला गोल करून वेल्सचा स्कोअर ३-० असा केला. वेल्सच्या तावडीत चेंडू येताच त्याने चेंडूवर ताबा मिळवत गोलपोस्टच्या दिशेने धाव घेतली. गोलकीपरला चकवत त्याने अप्रतिम गोल करून चाहत्यांची मने जिंकली. यानंतर शेवटपर्यंत आणखी गोल होऊ शकला नाही. रशियाने पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, ते यात अपयशी ठरले. वेल्सने त्यांना संधी दिली नाही. वेल्सने याप्रमाणे दमदार प्रदर्शन करून रशियाला ३-० ने मात देत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला.

बेलचा असाही विक्रम
साखळीतील तिन्ही सामन्यांत गोल करण्याचा विक्रम वेल्सच्या गॅरेथ बेलने केला. याआधी युरो चषकाच्या तिन्ही सामन्यांत गोल करण्याची कामगिरी २००४ मध्ये चेक गणराज्यच्या मिलान बारोस व हॉलंडच्या रुड वॅन निस्टरईने केली होती.

इंग्लंडने स्लोव्हाकियाला बरोबरीत रोखले
इंग्लंडने शानदार खेळ करताना स्लोव्हाकियासारख्या मजबूत संघाला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत ब गटाच्या सामन्यात गोलरहित बरोबरीत रोखले. सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, दोन्ही संघांनी ही संधी दवडली. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. यानंतर दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ झाल्यानंतरसुद्धा चेंडू गोलपोस्टमध्ये जाऊ शकला नाही. दुसऱ्या हाफमध्येसुद्धा खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, सामना गोलरहित बरोबरीत सुटला. इंग्लंडने याआधी वेल्सला २-१ ने हरवले होते, तर स्लोव्हाकियाने रशियाला २-१ ने मात दिली होती. हा सामना बरोबरीत सुटल्याने इंग्लंडचे तीन सामन्यांनंतर एक विजय, दोन बरोबरीसह ५ गुण झाले आहेत. या बरोबरीनंतरसुद्धा इंग्लंडने अंतिम १६ मध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. मात्र, इंग्लंडला आपले अव्वलस्थान गमवावे लागले.
बातम्या आणखी आहेत...