आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमानांनीे ३ सुवर्णांसह पहिला दिवस गाजवला, हँडबॉल : नाशिक, नागपूर, कोकण विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहर पोलिस मुख्यालयात २९ व्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली. स्पर्धेत पहिल्या दिवशी यजमान औरंगाबाद-नांदेड परिक्षेत्र संघाने तीन सुवर्णपकांची कमाई करत दणदणीत सुरुवात केली. प्रशिक्षण संचालनालयाने एक सुवर्णासह २ रौप्यपदके जिंकली. कोल्हापूरने १ सुवर्ण व १ कांस्यपदक, रेल्वे पोलिसांनी एक सुवर्ण आणि राज्य राखील पोलिस दलाने एक सुवर्णासह १ रौप्य व १ कांस्यपदक मिळवले. पुणे, ठाणे व मुंबई या बलाढ्य संघांना पहिल्या दिवशी एकही सुवर्ण जिंकता आले नाही. मुंबई शहरने एक रौप्य व २ कांस्य मिळवले. ठाणे शहरने १ रौप्यपदक, पुण्याने १ कांस्य आणि नाशिक विभागाने १ रौप्य व १ कांस्यपदकाची कमाई केली. पहिल्या दिवशी जयरी बोरगे आणि मोहसीन निझामोद्दीन यांनी नवीन  विक्रम रचला. वेटलिफ्टिंग प्रकारात औरंगाबादच्या नीलेश जाधवने ५६ किलो गटात १४० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
 
स्पर्धेत राज्यभरातून १३ संघांतील २५०० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या वेळी संघांनी व पोलिस बँड संघाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला विशेष पोलिस महासंचालक अजित पाटील, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, समादेशक निसार तांबोळी, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, संदीप आटोळे यांची उपस्थिती होती. या वेळी उत्कृष्ट शिस्त आणि गणवेशासाठी प्रशिक्षण संचालनालय संघाला आयुक्त अमितेशकुमार यांनी १० हजारांचे बक्षीस जाहीर केले. 
 
औरंगाबाद परिक्षेत्राची कबड्डीत आगेकूच 
कबड्डी स्पर्धेत यजमान औरंगाबाद-नांदेड विभागाच्या महिला-पुरुष संघांनी आपल्या प्रतिस्पर्धींना मात देत विजयी सलामी िदली. औरंगाबाद महिला संघाने नाशिक परिक्षेत्रावर ५३-१७ अशा मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.  दुसरीकडे पुरुष गटात औरंगाबाद-नांदेडने अमरावती विभागावर ५६-३४ अशा गुणांनी शानदार विजयाची नोंद करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. 

पोलिस क्रीडा स्पर्धेत प्रथमच हँडबॉल स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये खेळवली जात आहे. पहिल्याच सामन्यात कोकण विभागाकडून पराभूत झालेल्या यजमान औरंगाबाद-नांदेड विभागाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
   
पहिल्या लढतीत राज्य राखीव पोलिस दलाने अमरावती विभागाचा ३१-१० गोलने पराभव केला. विजेत्या संघाकडून स्वप्निल सिदरूकने ५, प्रशांत राऊतने ४, कृष्णा केंद्रेने ४, उस्मा पठाणेने ३ आणि ध्रुप हनमोरेने ३ गोल केले. दीपक धुरेने सर्वाधिक ९ गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान िदले. दुसऱ्या लढतीत नागपूर संघाने ठाणे शहरवर ४०-२९ गोलने दणदणीत विजय मिळवला. नागपूरकडून अरबाज खानने ७, रमाकांत बोंद्रेने ४, प्रशांत मानमोडेने ६, राहुल चिंचाळकरने ४ आणि टिळेश्वर चौधरीने ३ गोल करत संघाला विजयी केले. ठाणेकडून अमर पाटील व नितीन नंदीवालेने एकाकी झुंज दिली. तिसऱ्या लढतीत नाशिकने रेल्वे पोलिस संघाला ३५-२३ गोलने पराभवाची धूळ चारली.

हँडबॉल स्पर्धेत लहान मुलांची पंचगिरी
स्पर्धेसाठी आयोजकांनी तज्ज्ञ पंचांची यादी राज्य संघटना व क्रीडा कार्यालयाकडून मागवली आहे. तरीदेखील हँडबॉल स्पर्धेत लहान खेळाडूंचा पंच म्हणून वापर करण्यात येत आहे. चालू सामन्यात खेळाडू गुणांकन करत होते. सामन्यादरम्यान अनेक पंच गैरहजर असल्याचे दिसून आले. 

अॅथलेटिक्स : औरंगाबादची रेणुका दवणे चमकली 
अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेक प्रकारात यजमान संघाने सुवर्णपदक पटकावत पदकाचे खाते उघडले. स्पर्धेत औरंगाबाद परिक्षेत्राच्या रेणुका दवणेने ९.४१ मीटर लांब गोळाफेक करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षण संचालनालयाच्या माधुरी मोहरेने ९.२७ मीटर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. पुणे शहरच्या प्रियंका दानेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने ९.१० मीटर लांब गोळा फेकला. 

जयश्रीकडून स्वत:चा विक्रम मोडीत : महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत जयश्री बोरगे हिने गतवर्षीचा स्वत:चा ४.३७.०१ सेकंदांचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम रचला. तिने ४.३४.०४ सेकंद अशा विक्रमी वेळेसह शर्यत जिंकली. मुंबई शहरच्या संगीता नाईकने ४.४६.०५ सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले. कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटीलने ४.५९.०० सेकंदांत कांस्यपदक आपल्या नावे केले.
  
मोहसीनची विक्रमी कामगिरी : हातोडा फेकमध्ये प्रशिक्षण संचालनालयाच्या मोहसीन निझामोद्दीन ४६.३९ मी. लांब हातोडाफेक करून विक्रम रचला. मोहसीनने कोकणच्या प्रशांत चव्हाणचा ४५.६५ मीटरचा जुना विक्रम मोडला. नाशिकच्या हेमंत बारीने रौप्य, तर भूषण चिट्टेने कांस्यपदक मिळवले.  

लांब पल्ल्यात सचिनची बाजी : दहा हजार मीटर शर्यतीत राज्य राखीव पोलिस दलाच्या सचिन घारोटेने ३२.३२.०३ सेकंदांत पहिला क्रमांक पटकावला. बालाजीने ३३.१८.०२ सेकंदांत दुसरा, तर मुंबई शहरच्या सिद्धराम डोंगरजेने ३४.०२.०९ सेकंदांत तिसरा क्रमांक राखला. 
रेल्वेसाठी अमोलचे पहिले पदक : १५०० मीटरमध्ये अमोल संकपाळने ४.०५.०१ सेकंदांत सुवर्ण पटकावत आपल्या रेल्वे संघाला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले. प्रशिक्षण संचालनालयाच्या  सिद्धेश्वर रायगोंडाने ४.१३.०४ सेकंदांत रौप्य जिंकले.

जालन्याच्या अखिल पटेलची सुवर्ण उडी 
लांब उडी प्रकारात औरंगाबाद व नांदेड विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल रुस्तम पटेलने सुवर्णपदक पटकावले. ठाणे शहरच्या अमित पवारने रौप्यपदक, तर मुंबई शहरच्या अमेय इंदुलकरने कांस्यपदक जिंकले. 

फुटबॉलमध्ये नागपूर, मुंबई, नाशिकची विजयी सलामी  
मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत यजमान औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्र संघाला पराभवाचा धक्का बसला. पहिल्या लढतीत औरंगाबादला नागपूर संघाने ०-२ गोलने पराभवाची धूळ चारली. सामन्याच्या ९ व्या मिनिटाला संतोष काणेकरने आणि १७ व्या मिनिटाला अखिल कुरेशीने गोल करून संघाची २-० ने विजयी केले. दुसऱ्या लढतीत  मुंबई परिक्षेत्राने पुणे परिक्षेत्रावर २-० ने एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये १४ व्या मिनिटाला ऋषभ वाघने शानदार गोल केला. त्यानंतर नीलेश कोरगावकरने २१ व्या मिनिटाला दुसर गोल करत संघाला २-० ने पुढे नेले. दुसऱ्या हाफमध्ये एकही गोल होऊ शकला नाही. अखेर मुंबईने २-० ने पुण्यावर मात केली. तिसऱ्या लढतीत नाशिकने रेल्वे पोलिस संघावर २-० गोलने मात केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...