पॅरिस - फ्रेंच ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत जगातील नंबर वन सायना नेहवाल आणि पी. कश्यपने विजयी सलामी दिली. यासह सायना व कश्पयने आपापल्या गटाची दुसरी फेरी गाठली.
मात्र युवा खेळाडू के. श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे सलामीलाच आव्हान संपुष्टात आले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने अवघ्या ४२ मिनिटांमध्ये महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. तिने सलामी सामन्यात कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव केला. अव्वल मानांकित सायनाने २१-१८, २१-१३ ने विजय मिळवला.
श्रीकांतची झुंज अपयशी : भारताच्या श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात विजयासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याला तिएन होउवेईने पराभूत केले. तिएनने २१-१५, १३-२१, २१-११ ने सामना जिंकला. यासाठी त्याला ६३ मिनिटे श्रीकांतने झुंजवले.
कश्यपची थॉमसवर मात
राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी. कश्यपने यजमान टीमच्या थॉमस रोउक्लेला आपल्या घरच्या मैदानावर धूळ चारली. त्याने सरळ दोन गेममध्ये सामना जिंकला. कश्यपने सरस खेळी करून २१-११, २२-२० ने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह त्याने दुसरी फेरी गाठली.