आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच ओपन टेनिस: सेरेना...काही केल्या हरेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर सेरेनाने असा जल्लोष केला. - Divya Marathi
विजयानंतर सेरेनाने असा जल्लोष केला.
पॅरिस - अमेरिकेची नंबर वन टेनिसपटू आणि महिला गटात जगातील अव्वल खेळाडू सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात अव्वल मानांकित सेरेनाने जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या सारा इराणीला एकतर्फी लढतीत सहज पराभूत केले. सेरेनाशिवाय टी. बेसेनस्कीने सुद्धा महिला गटात उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे महिला दुहेरीत भारताची नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वीत्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस जोडीचा पराभव झाला.

सेरेनाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना शानदार पद्धतीने जिंकला. तिने विरोधी खेळाडूला सामन्यात परण्याची एकही संधी दिली नाही. सुरुवातीपासून आक्रमक आणि बेसलाईनवरुन खेळ करणा-या सेरेनाने ६-१, ६-३ ने विजय मिळवला. सेरेनाने सामन्यात तब्बल १० ऐस मारले, तर सारा इराणीला एकही ऐस मारता आला नाही. यावरुनच सेरेनाच्या आक्रमक खेळाचा अंदाज येऊ शकतो. सेरेनाने सामन्यात दोन डबल फॉल्टही केले. मात्र, ८ पैकी पाच वेळा सारा इराणीची सर्व्हिस मोडून तिने सामन्यात दबदबा राखला. साराने एकवेळा सेरेनाची सर्व्हिस मोडली. सेरेनाने सामन्यात तब्बल ३९ विनर्स मारले तर साराला केवळ ९ विनर्स मारता आले. सेरेना या सामन्यात गुणांच्या तुलनेत सारा इराणीच्या तुलनेत ६२-४२ अशी वरचढ ठरली.

महिला गटातील इतर एका उपांत्यपूर्व सामन्यात स्वीत्झर्लंडच्या टी. बेसेनस्कीने दमदर खेळ करून बेल्जियमच्या वॅन उतवॅँकला दोन सेटमध्ये पराभूत केले. बेसेनस्कीने ही लढत ६-४, ७-५ अशी जिंकली. ही लढत तशी रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी अखेरपर्यंत विजयासाठी झुंज दिली. यात स्वीस खेळाडूने बाजी मारली. बेसेनस्क्ीने सामन्यात विरोधी खेळाडूच्या तुलनेत कमी ऐस मारले. बेसेनस्कीने ३ तर उतवँकने ५ ऐस मारले. उतवँकला स्वत:च्या चुका भोवल्या. तिने ३ डबल फॉल्ट करून सामना फिरवला. याशिवाय बेल्जियमच्या खेळाडूने २१ साध्या चुका केल्या. बेसेनस्कीने सामन्यात ३९ तर उतवँकने २८ विनर्स मारले. येथेच दोघांत अंतर निर्माण झाले. बेसेनस्कीने ही लढत ८४-६९ अशा गुण फरकाने आपल्या नावे केली.

जोकाेविच विजयी
अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने सहाव्या मानांकित स्पेनचा क्लो कोर्ट किंग राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला. नोवाकने तीन सेटमध्ये विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये नोवाकने ७-५ ने बाजी मारली. दुस-या सेटमध्ये नदालला नोवाकचे आक्रमण रोखता आले नाही. नोवाकने ६-३ ने सेट जिंकला. तिस-या निर्णायक सेटमध्ये नोवाकच्या शानदार खेळापुढे नदालची डाळ शिजली नाही. नोवाकने ६-१ ने सेटसह सामना आपल्या नावे केला.

सानिया-हिंगीस पराभूत
महिला दुहेरीत भारताची नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस यांचा पराभव झाला. सानिया-हिंगीस जोडीला बाटेनी माटेक-सँड्स आणि लुसी सफारोवा जोडीने ७-५, ६-२ असे दोन सेटमध्ये पराभूत केले. माटेक-सफारोवा जोडीने सामन्यात ३ तर सानिया-हिंगीस यांनी एक ऐस मारला. सानिया-हिंगीस जोडीने सामन्यात एक डबल फॉल्टही केला. सानिया-हिंगीस जोडीला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही.

विजय सोपा नव्हता
इटलीच्या सारा इराणीविरुद्ध माझा विजय सोपा नव्हता. सारा मजबूत प्रतिस्पर्धी खेळाडू आहे. तिने मैदानावर माझ्यापेक्षा अधिक चपळ खेळ केला. तिच्यासारख्या खेळाडूविरुद्ध विजय मिळाल्याने मी आनंदित आहे. ही लय मी पुढच्या सामन्यातही कायम ठेवेल.
सेरेना विल्यम्स