जकार्ता - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या एच.एस.प्रणय अाणि के. श्रीकांतने सलग दुसऱ्या सामन्यात सनसनाटी विजय संपादन करून शुक्रवारी इंडाेनेशिया सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. प्रणयने अंतिम अाठमध्ये वर्ल्ड अाणि अाॅलिम्पिक चॅम्पियन चेन लाेंगला धूळ चारली. दुसरीकडे श्रीकांतने चीन-तैपेईच्या वेई वांगला सरळ दाेन गेममध्ये पराभूत केले.
विजयी माेहीम कायम ठेवताना त्यांनी किताबावरचा अापला दावा मजबूत केला. त्यामुळे त्यांच्यावर खास नजर असेल. माजी नंबर वन सायना अाणि सिंधूच्या पराभवामुळे अाता या दाेघांकडून भारताला अजिंक्यपदाची अाशा अाहे.
एच.एस.प्रणयने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये अाठव्या मानांकित चेन लाेेंगला पराभूत केले. त्याने २१-१८, १६-२१, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याने तब्बल एक तास १५ मिनिटे शर्थीची झुंज दिली. त्यामुळे त्याने सनसनाटी विजय संपादन करून अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला.
प्रणयचा लाेंगवर पहिला विजय
प्रणयने अापल्या करिअरमध्ये प्रथमच अाठव्या मानांकित लाेंगवर विजय संपादन केला. अातापर्यंत अांतरराष्ट्रीय स्तरावर प्रणय अाणि लाेंग यांच्यात चार सामने झाले. यामध्ये लाेंगने सलग तीन वेळा प्रणयला पराभूत केले. मात्र, प्रणयने पराभवाची मालिका खंडित करून लाेंगवर मात केली.