आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाेकियाे ऑलिम्पिकमध्ये पदकांची ‘उम्मीद’ सेहवाग अाता खेळाडूंच्या पूर्वतयारीचे दर्शन घडवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमधून पदके आणणे हे भारतीय अॅथलिट्सचे आणि तमाम भारतीयांचे ध्येय आहे. पदके पटकावणे हे एकमेव स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या १३ भारतीय खेळाडूंना “उम्मीद इंडिया’ या कार्यक्रमाद्वारे टेलिव्हिजन वाहिनीच्या माध्यमाद्वारे भारतीयांसमोर आणण्याचे कार्य भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग करणार आहे. टेलिव्हिजन वाहिनीवर असा कार्यक्रम सादर करण्याची वीरेंद्र सेहवागची ही पहिलीच वेळ असेल. 
 
एकूण १३ भागांमध्ये हा कार्यक्रम विभागण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू महिला खेळाडू साक्षी मलिक, पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावरील समीक्षकांचे व खेळाडूंचे लक्ष वेधून घेणारा रोइंगपटू महाराष्ट्राचा दत्तू भोकनाळ, सुयश जाधव, अवतारसिंग, ओ. पी. कारान्हा, महिला कुस्तीगीर विनेश फोगाट, धावपटू द्युती चंद आदींच्या ऑलिम्पिक पूर्वतयारीची झलकही या कार्यक्रमात पाहायला मिळेल.  

ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास किती खडतर असतो, त्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागतात, प्रशिक्षणासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो आदी गोष्टींचे चित्रीकरणही ‘उम्मीद इंडिया’ मालिकेत पाहायला मिळणार अाहे. स्वत: सेहवाग प्रत्येक खेळाडूच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये किंवा प्रशिक्षणाच्या जागेवर जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहनपर समुपदेशन करणार आहे.  खेळाडूंच्या कुटुंबीयांशीदेखील सेहवाग चर्चा करणार अाहे. त्यांच्या प्रशिक्षकांशी बोलणार आहे. 
 
विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि सरकारी यंत्रणेतील संबंधितांशी सेहवागची चर्चा रंगणार आहे.  आरोप-प्रत्यारोप, आक्षेप आणि उणिवा, कमतरता यांच्यामुळे या चर्चेला वादाची खमंग फोडणी मिळण्याची शक्यता आहे.  आपल्या स्फोटक फलंदाजीप्रमाणेच जिभेचाही धारदारपणे वापर करणारा सेहवाग आपल्या पहिल्याच टेलिव्हिजन मालिकेद्वारे प्रेक्षकांवर किती प्रभाव पाडतो, यावरच ‘उम्मीद इंडिया’ची आशा आहे.  
बातम्या आणखी आहेत...