समोआ - भारतीय अॅथलिटने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत मैदानी स्पर्धेत बुधवारी तिसर्या आणि अखेरच्या दिवशी दोन कांस्यपदके पटकावली. या क्रीडा प्रकरात भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह एकूण ६ पदके मिळवली.
अखेरच्या दिवशी देशाचे दोन अव्वल खेळाडू पदकापासून वंचित राहिले. प्रसिद्धीच्या झाेतापासून दूर असलेल्या दोन खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत कांस्यपदक भारताच्या खात्यात जमा केले. पी.टी. उषाची शिष्या केरळीच धावपटू अबिता मॅरी मेनुअलने मुलींच्या ८०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. तिने दोन मिनिटे ०७.३३ सेकंदांत कांस्य जिंकले. मेनुअलने आपल्या राज्यातील धावपटू जे.सी. जोसेफचा विक्रम तोडला. जोसेफने बंगळुरू येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन मिनिटे ०८.८४ सेकंदांत भारताचा युवा विक्रम रचला होता.
ऑस्ट्रेलियाच्या एमी हार्डिंग डेलजने दोन मिनिटे ०६.८४ सेकंदांत सुवर्णपदक पटकावले. स्कॉटलंडच्या कॅरिस मॅकॉलेने दोन मिनिटे ०७.०५ सेकंदांत रौप्यपदक जिंकले. स्क्वॅशमध्ये भारताच्या सेंथिलकुमार व हर्षित जवांदा यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अनामिकाला कांस्यपदक
भारताला दुसरे कांस्यपदक महिला गोळफेकपटू अनामिका दासने मिळवून दिले. उत्तर प्रदेशच्या अनामिकाने तीन किलोचा गोळा १५.०३ मीटर लांब फेकत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन सादर केले. ती मेघना देवांगाच्या १५.३५ मीटर या राष्ट्रीय विक्रमापासून दूर राहिली. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेस रॉबिन्सनने १६.३९ मीटर लांब गोळा फेकून सुवर्ण, तर इंग्लंडच्या सोफी मॅरिट्टने (१५.७८) मीटर रौप्यपदक जिंकले. पदकाची आशा असलेल्या आशिष भलोथियाने निराशा केली. गोळाफेकीमध्ये तो पाचव्या स्थानावर राहिला. मुलांच्या ८०० मीटर शर्यतीत युवा आशियाई चॅम्पियन बेअंत सिंग एक मिनिट ५१.०८ सेकंदासह सहाव्या क्रमांकावर राहिला.