लंडन- भारतीय संघाचे प्रथमच चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेश निश्चित करण्याचे स्वप्न जवळपास भंगले अाहे. मात्र,भारताला इंग्लंड अाणि बेल्जियम सामन्यातील निकालातून एक संधी मिळू शकणार अाहे. इंग्लंड बेल्जियम यांच्यात हाेणाऱ्या सामन्याच्या निकालातून काही चमत्कार घडण्याची शक्यता अाहे. भारताची १३ वेळच्या चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाविरुद्धची झंुज अपयशी ठरली. सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अाॅस्ट्रेलियाने ४-२ ने सामना जिंकून स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.
मिल्टन ट्रेंट (२० मि.), झालेवास्की (२३ मि.), फ्लाॅन (३५ मि.) अाणि व्हाइट ट्रिस्टन (४५ मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर अाॅस्ट्रेलियाने सामना जिंकला. भारतीय संघाकडून व्ही. रघूनाथ (४५ मि.) अाणि मनदीप सिंग (४९ मि.) यांनी गाेल केले. मात्र, इतर खेळाडूंना समाधानकारक खेळी करता अाली नाही. परिणामी, भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
अाॅस्ट्रेलिया टीमने दमदार सुरुवात करताना अवघ्या २० मिनिटांत अाघाडी मिळवली. मिल्टनने गाेलचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत झालेवास्कीने अाॅस्ट्रेलियाच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. त्यानंतर दहा मिनिटांच्या फरकाने फ्लाॅन ट्रिस्टनने गाेल करून अाॅस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. भारतीय संघाला ४५ व्या मिनिटाला पहिला गाेल करता अाला. रघूनाथ मनदीपने चार मिनिटांच्या फरकाने भारताकडून गाेल केले. मात्र,टीमला पराभव टाळता अाला नाही.