टाेकियाे - राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी. कश्यपने जपान आेपन चॅम्पियनशिपमध्ये दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याचे पुरुष एकेरीतील पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूपाठाेपाठ, सायना, श्रीकांतसह आता कश्यपलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या कश्यपला पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या चु तिएन चेनने भारताच्या खेळाडूचा सरळ दाेन गेममध्ये पराभव केला. त्याने २१-१४, २१-१८ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह भारताच्या कश्यपने विजयासाठी दिलेली ४२ मिनिटांची झुंज अपयशी ठरली. यासह चेनने कश्यपविरुद्ध विजयाच्या आकडेवारीत २-२ ने बराेबरी साधली. यापूर्वी चीनच्या या खेळाडूने आॅल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत कश्यपला धूळ चारली हाेती. याशिवाय त्याने कश्यपविरुद्धची विजयी लय कायम ठेवली. मात्र, भारताच्या खेळाडूला चेनविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करता आली नाही.