कुवेत सिटी - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी १३ व्या अाशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा षटकार मारला. भारताच्या संघाने चाैथ्या दिवशी सहा सुवर्ण अाणि एका राैप्यपदकावर नाव काेरले. भारताची स्टार हिना सिद्धू, अाैरंगाबादची गुणवंत नेमबाज हर्षदा निठवेने चाैथ्या दिवशी सुवर्णवेध घेतला. यासह भारताला स्पर्धेतील अापला दबदबा कायम ठेवता अाला. चाैथ्या दिवसअखेर भारताच्या नावे अाता एकूण २८ पदके झाली अाहेत.
हिनाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने फायनलमध्ये १९८.२ गुणांसह हे साेनेरी यश संपादन केले. तिने या गटात मंगाेलियाच्या गुंडेग्मा अाेट्रेयादला पिछाडीवर टाकून अव्वल स्थान गाठले. काेरियाची जांगमी किम कांस्यपदकाची मानकरी ठरली.
श्रीनिवेता चॅम्पियन
भारताची युवा नेमबाज श्रीनिवेता ही महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात चॅम्पियन ठरली. तिने या गटात सुवर्णपदकावर नाव काेरले. श्रीनिवेताने फायनलमध्ये १९५.८ गुणांसह अव्वल स्थान गाठले. यासह तिने भारताला सुवर्ण मिळवून दिले. भारताच्या शिवम शुक्लाने २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याने ५७६ गुणांसह अव्वल स्थान गाठले. यातील संाघिक गटात शिवमने अर्जुन दास अाणि अचल प्रतापसाेबत भारतीय संघाला राैप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
हर्षदाला सुवर्णपदक
अाैरंगाबादच्या हर्षदा निठवेने भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक गटात साेनेरी यश संपादन केले. तिने नयनी भारद्वाज अाणि मलाईकासाेबत अव्वल स्थान गाठले. यामध्ये नयनीने ३७४, हर्षदाने ३७४ अाणि मलाईकाने ३६५ गुणांची कमाई केली.
अाैरंगाबादचा दबदबा कायम
कुवेत सिटीमध्ये सुरू असलेल्या अाशियाई नेमबाजी स्पर्धेत अाैरंगाबादच्या नेमबाजांनी अापला दबदबा कायम ठेवला. यामध्ये युवा नेमबाज सुमेधकुमार देवसह हर्षदा निठवे अाघाडीवर अाहे. सुमेधपाठाेपाठ हर्षदाने भारतीय संघाकडून पदकाची कमाई केली. तिने सांघिक गटात भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.