आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा चॅम्पियन ! फायनलमध्ये पाकवर ६-२ ने केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुआनतन (मलेशिया) - ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या हॅट्रिकसह चार गोलच्या बळावर भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६-२ ने धुव्वा उडवत तिसऱ्यांदा ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने दोन्ही हाफमध्ये प्रत्येकी तीन गोल केले. या स्पर्धेच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा भारत आणि पाक समोरासमोर होते. १९९६ मध्ये पाकिस्तानने भारताला हरवले होते, तर २००४ मध्ये भारताने पाकला चीत केले होते. आता पुन्हा पाकिस्तानला नमवत भारतीय युवांनी किताब जिंकला.
भारताने संपूर्ण स्पर्धेत अजेय राहताना ही स्पर्धा आपल्या नावे केली. हरमनप्रीतने १० व्या, १५ व्या, ३० व्या आणि ५३ व्या मिनिटाला असे एकूण चार गोल केले. तर अरमान कुरेशीने ४४ व्या आणि मनप्रीत ज्युनियरने ५० व्या मिनिटाला गोल केले. पाकिस्तानकडून याकूब मोहंमदने २८ व्या तर दिलबर मोहंमदने ६८ व्या मिनिटाला गोल केले.

भारताला पाकिस्तानकडून कडवे आव्हान मिळण्याची आशा होती. मात्र, भारतीय युवांनी तुफानी कामगिरी करताना पाकिस्तानविरुद्धचा फायनल सामना एकतर्फी केला. भारताने स्पर्धेच्या साखळीतील तिन्ही सामने जिंकल्यानंतर क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्येसुद्धा एकतर्फी विजय मिळवला. भारताने सेमीफायनलमध्ये जपानला ६-१ ने मात दिली होती. आता फायनलमध्येसुद्धा भारताने सहा गोल केले.

सात वर्षांनंतर भारत विजेता
भारताने ही स्पर्धा जिंकत तीन वेळा विजेतेपद पटकावण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताने यापूर्वी २००४ आणि २००८ मध्ये आशिया कप ज्युनियरचे विजेतेपद जिंकले होते.

कोरियाला कांस्यपदक : कोरियाने जपानला २-१ ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले. यजमान आणि गतचॅम्पियन मलेशियाने बांगलादेशला ८-० ने पराभूत करून पाचवे स्थान गाठले, तर चीनने सातवे स्थान मिळवले.

हरमनप्रीतची हॅट्ट्रिक
फायनलमध्ये भारताच्या श्रेष्ठत्वापुढे पाकने गुडघे टेकले. स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करीत असलेल्या हरमनप्रीतने १० व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतला १५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर भारताने दुसरा गोल केला. पाकिस्तानने पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्याकडून २८ व्या मिनिटाला याकूबने गोल करून सामना २-१ असा केला. हरमनप्रीतने ३० व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर तिसरा गोल करून आपल्या गोलची हॅट्रिक पूर्ण केली. हाफटाइमपर्यंत भारत ३-१ ने पुढे होता.
पाक हॉकी टीम पूर्णपणे बॅकफुटवर
दुसऱ्या हाफमध्ये भोपाळच्या अरमान कुरेशीने ४४ व्या मिनिटाला गोल करून स्कोअर ४-१ असा केला. मनप्रीत ज्युनियरने ५० व्या मिनिटाला गोल करून भारतासाठी पाचवा गोल केला. हरमनप्रीतने सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला आपला चौथा आणि भारताचा सहावा गोल केला. या गोलनंतर पाक टीम पूर्णपणे बॅकफुटवर अाली. पाकने आपला दुसरा गोल ६८ व्या मिनिटाला केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिलबर मोहम्मदने हा गोल करून पराभवाचे अंतर कमी केले. भारताने अखेरीस ६-२ ने विजय मिळवला.
कोच हरेंद्र सिंग यांचा जोरदार जल्लोष
सामना संपताचा कोच हरेंद्र सिंग युवा भारतीय संघाच्या किताबी विजयाच्या जल्लोषात सामील झाले. त्याने खेळाडूंची गळाभेट घेतली आणि अभिनंदन केले. कोच हरेंद्र सिंग यांच्या आनंदाला सीमा नव्हती. भारतीय सीनियर टीमने मागच्या वर्षी आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये जो पराक्रम केला तोच पराक्रम यंदा ज्युनियर टीमने केल्याने हरेंद्र सिंग आनंदात होते. आमची टीम मजबूत आहे. युवा खेळाडूंनी स्वत:च्या क्षमतेनुसार खेळ केला. आम्ही आता विजेतेपदासह भारतात येत आहोत, अशी प्रतिक्रिया हरेंद्र यांनी व्यक्त केली.

ज्युनियर विश्वकप भारतात होणार
या विजेतेपदानंतर भारताने डिसेंबर २०१६ मध्ये भारतात होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी आपली दावेदारी मजबूत असल्याचे सिद्ध केले. यजमान असल्याने विश्वचषकातील भारताचा प्रवेश तसाही निश्चित होता. आता उपविजेता पाकिस्तान टीम, तिसऱ्या स्थानावरील कोरिया, चौथ्या स्थानावरील जपाननेसुद्धा ज्युनियर विश्वचषकासाठी क्वालिफाय केले. ही स्पर्धा भारतात होणार असली तरीही स्पेन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि हॉलंडच्या युवा संघाचे भारतीय युवांपुढे तगडे आव्हान असेल.
- ०७ वर्षांनंतर भारताला विजेतेपद
- ०३ वेळा विजेतेपद भारताच्या नावे
- ०४ गोल केले हरमनप्रीतने
- २००४, २००८, २०१५ मध्ये भारताला विजेते
- ज्युनियर विश्वचषकाची तयारी करणार