आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीटीएल : जपानची यूएईवर २४-२१ ने मात, शानदार "कमबॅक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेसच्या दुहेरीतील शानदार प्रदर्शनाच्या बळावर जपान वॉरियर्सने पहिले दोन सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करून िवजय मिळवला. इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगच्या (आयपीटीए) दुसऱ्या सत्रात जपान वॉरियर्सने यूएई रॉयल्सला गुरुवारी २४-२१ ने हरवले.

जपान वॉरियर्सने येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयपीटीएलच्या दिल्ली सत्रात महिला एकेरी आणि पुरुष लिजेंड एकेरीचे सामने गमावले. मात्र, यानंतर जपानच्या टीमने शानदार पुनरागमन करून पुरुष दुहेरी, पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत विजय मिळवून बाजी मारली. या सामन्यात यूएई रॉयल्सच्या अॅना इवानोविचने महिला एकेरीत जपानच्या कुरुमी नाराला सहजवणे ६-२ ने मात दिली. लिजेंड सिंगलमध्ये माजी विम्बल्डन चॅम्पियन गोरान इवानिसविचने जपानच्या थॉमस एंक्विस्टला ६-४ ने मात दिली. पहिल्या दोन सेटमध्ये यूएईचा स्कोअर १२-६ असा मजबूत होता. पुरुष दुहेरीत लिएंडर पेस आणि पियरे हरबर्ट यांनी टॉमस बर्डिच आणि डॅनियल नेस्टर यांना ६-३ ने पराभूत केले.

पुरुष एकेरीत फिलिप कोलश्वेबरने बर्डिचला ६-४ ने मात दिली. चार सेटनंतर रॉयल्सचा स्कोअर १९ गेम आणि जपानचा १८ गेम असा होता. सर्व मदार निर्णायक मिश्र दुहेरीच्या सामन्यावर होती. मिश्र दुहेरीत मीर जानालुसिच आणि हरबर्ट जोडीने क्रिस्टिना म्लादेनोविच आणि नेस्टर जोडीला ४-० ने आघाडी मिळवल्यानंतर ६-२ ने हरवले. यानुसार जपानने हा सामना शानदार पुनरागमन करून २४-२१ ने जिंकला.
तिकीट महाग, मोजकेच प्रेक्षक
आयपीटीएलमध्ये या वेळी सर्वांत कमी किमतीचे तिकीट ४ हजार रुपये तर सर्वांत महागडे तिकीट ४८ हजार रुपयांचे आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळत आहेत. मात्र, तिकिटांची किंमत बघून प्रेक्षकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली. या दिग्गजांचा खेळ पाहण्यासाठी मोजकेच प्रेक्षक स्टेडियममध्ये होते.