आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kohli Opportunity To Record 900 Points, 895 Points In The Batting Rankings

कोहलीला विक्रमी 900 गुणांची संधी, फलंदाजांच्या क्रमवारीत सध्या 895 गुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या एकमेव कसोटीनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली असून, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला हैदराबादेत कसोटीत द्विशतक ठोकल्याने २० रेटिंग गुणांचा फायदा झाला आहे. कोहली आता ८९५ गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वलस्थानी असलेला आॅस्ट्रेलियाचा स्टिवन स्मिथ कोहलीपेक्षा ३८ गुणांनी पुढे आहे.   

गावसकरनंतर दुसरा भारतीय बनणार: क्रमवारीत ९०० या जादुई आकड्यापासून कोहली केवळ ५ गुणांनी मागे आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महान सलामीवीर सुनील गावसकर असे एकमेव फलंदाज आहेत, ज्यांनी ९०० रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडला होता. गावसकर यांच्या नावे सर्वाधिक ९१६ रेटिंग गुण होते. भारताकडून आजपर्यंत गावसकर यांच्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला  ९०० गुणांचा टप्पा गाठता आलेला नाही. आता कोहलीकडे ही संधी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सर्वश्रेष्ठ रेटिंग गुण ८९८ इतके होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत दमदार प्रदर्शन करून ९०० गुणांचा टप्पा ओलांडण्याची कोहलीकडे संधी असेल.   

पुजारा पुन्हा टॉप-१० मध्ये सामील
चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्ध कसोटीत दोन अर्धशतके ठोकली. यामुळे त्याने तीन स्थानांनी प्रगती केली. ताे आता पुन्हा टॉप-१० मध्ये परतला आहे. पुजारा टॉप-१० मध्ये आल्याने द. आफ्रिकेचा ए.बी.डिव्हिलर्स टॉप-१० बाहेर झाला आहे. ज्यो. रुट तिसरा, केन विल्यम्सन चौथा, डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानी आहे. हाशिम आमला सहाव्या, अझहर अली सातव्या, युनिस खान आठव्या, क्विंटन डीकॉक दहाव्या क्रमांकावर आहे. भारताकडून मुरली विजय एका स्थानाच्या प्रगतीसह २६ व्या, वृद्धिमान साहा १२ स्थानांच्या प्रगतीसह ५७ व्या स्थानी आहे.   

अश्विन, जडेजाचा दबदबा कायम   
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत आर. अश्विन नंबर वन तर रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानी कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड तिसऱ्या स्थानी आहे. टॉप-१० गोलंदाजांच्या स्थानांत बदल झालेला नाही. टॉप-१० बाहेर मो. शमीचे एका स्थानाचे नुकसान झाले. तो २० व्या स्थानी आहे. भारताचा उमेश यादव २ स्थानांच्या प्रगतीसह ३४ व्या स्थानी आहे. 
बातम्या आणखी आहेत...